नाव घ्यायला लाजल्या आणि मतदानाला मुकल्या

मंडळी… आजकाल आपलं नाव सांगायला कोण लाजतं का, तर नाही. ही झाली आजकालची गोष्ट! पण सत्तर वर्षांपूर्वी प्रामुख्याने महिला विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपले पूर्ण नाव सांगायला लाजत होत्या. पूर्ण नाव सांगायला लाजून नकार दिल्यामुळे देशाच्या पहिल्या निवडणुकीत तब्बल 28 लाख महिला मतदानाला मुकल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या दप्तरी या गमतीशीर किश्श्याची नोंद आढळून येते. पतीचं … The post नाव घ्यायला लाजल्या आणि मतदानाला मुकल्या appeared first on पुढारी.

नाव घ्यायला लाजल्या आणि मतदानाला मुकल्या

कोल्हापूर, सुनील कदम

मंडळी… आजकाल आपलं नाव सांगायला कोण लाजतं का, तर नाही. ही झाली आजकालची गोष्ट! पण सत्तर वर्षांपूर्वी प्रामुख्याने महिला विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपले पूर्ण नाव सांगायला लाजत होत्या. पूर्ण नाव सांगायला लाजून नकार दिल्यामुळे देशाच्या पहिल्या निवडणुकीत तब्बल 28 लाख महिला मतदानाला मुकल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या दप्तरी या गमतीशीर किश्श्याची नोंद आढळून येते.
पतीचं नाव कसं घ्यायचं?
ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 दरम्यान देशाची पहिली निवडणूक झाली. त्या काळात महिलांनी आपल्या नवर्‍याचं नाव न घेण्याची प्रथा होती. त्यामुळे महिला चुकूनसुद्धा आपल्या नवर्‍याचं नाव घेत नसत. नावाऐवजी प्रांतानुसार नवर्‍याचे वेगवेगळे उल्लेख केले जायचे. जसे की महाराष्ट्रात आमचे हे, आमची स्वारी, मालक, कारभारी, धनी वगैरे वगैरे. 1950 साली देशात निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि मतदार नोंदणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदार नोंदणी करण्यासाठी घरोघरी गेले, की महिला लाजून आपले नाव सांगायच्या नाहीत. कारण पूर्ण नाव सांगायचं तर पतीचं नाव घ्यायला लागणार. त्यामुळे अनेक महिला आपले नावच सांगायच्या नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे लाजून आपले नाव न सांगणार्‍या तब्बल 28 लाख महिलांची मतदार म्हणून नोंदच होऊ शकली नाही. परिणामी, त्या महिला मतदानापासून वंचित राहिल्या. आजकालच्या जमान्यात हे जरा विचित्र वाटेल; पण त्यावेळच्या सामाजिक चालीरिती विचारात घेतल्या, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.
लक्षवेधी निवडणूक!
देशाची पहिली निवडणूक अनेक अर्थाने जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरली होती. कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीच्या यशस्वितेबद्दल शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, देशाचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी अतिशय काटेकोर यंत्रणा राबवून ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडली. या निवडणुकीत काँग्रेस, सोशालिस्ट पार्टी, कम्युनिस्ट, जनसंघासह एकूण 14 राष्ट्रीय आणि 40 स्थानिक पक्ष सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे जवळपास 17 कोटी मतदारांनी निवडणूक यंत्रणेत आपला सहभाग नोंदविला होता.
देशभर काँग्रेसचा प्रभाव!
त्या काळात देशभर सर्वत्र काँग्रेसचा प्रभाव होता, त्यामुळे साहजिकच या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली. पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 489 पैकी लोकसभेच्या 364 जागा जिंकल्या. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालीत सोशालिस्ट पार्टीने 12 जागा, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने 3, तर कम्युनिस्टांनी 16 जागा जिंकल्या होत्या.
निवडणूक चिन्ह कसं आलं!
भारतात त्याकाळी मतदार म्हणून नोंदविण्यात आलेल्या जवळपास 17 कोटी मतदारांपैकी 86 टक्के मतदार अशिक्षित होते. त्यामुळे त्यांना आपल्या उमेदवाराचे नाव वाचता येणेच शक्य नव्हते. या अशिक्षित मतदारांच्या सोयीसाठी म्हणून प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढे एक ठराविक चिन्ह नोंदविण्याची पद्धत या पहिल्याच निवडणुकीपासून रूढ झालेली आहे आणि आजही ती सुरूच आहे. आज देशातील साक्षरतेची पातळी बर्‍याच प्रमाणात वाढली असली, तरी मतदारांच्या सोयीसाठी ही चिन्हाची प्रथा मात्र कायम आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र!
आजकाल लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पण देशाची पहिली निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा अशी एकत्रच झाली होती. लोकसभेच्या 489 जागा आणि देशातील वेगवेगळ्या विधानसभांच्या 4011 जागा अशी एकत्रित ही निवडणूक झाली होती. बहुतांश ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती, तरी काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनीही कडवी झुंज दिली होती.
Latest Marathi News नाव घ्यायला लाजल्या आणि मतदानाला मुकल्या Brought to You By : Bharat Live News Media.