चीनमध्ये 800 वर्षांपूर्वीच्या शाही मकबर्यांचा शोध
बीजिंग : चीनच्या शांक्सी प्रांतात पुरातत्त्व संशोधकांनी तीन शाही मकबरे शोधून काढले आहेत. हे मकबरे चेंगझी शहरात असून, ते ‘जुर्चेन जिन’ किंवा ‘ग्रेट जीन’ साम्राज्याच्या काळातील आहेत. हे साम्राज्य उत्तर चीनमध्ये सन 1115 ते 1234 या काळात अस्तित्वात होते.
विशेष म्हणजे जुर्चेन जिन राजे हे मूळ चिनी वंशाचे म्हणजेच हान वंशाचे नव्हते. सध्या हान वंशच चीनमध्ये प्रामुख्याने आढळतो. जुर्चेन राजे हे ईशान्य चीनमधील सेमिनोमेडिक लोक होते, अशी माहिती आयर्लंडच्या युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्कमधील चिनी इतिहासाच्या प्राध्यापिका ज्युलिया श्निडर यांनी दिली. या मकबर्यांच्या संशोधन कार्यात त्यांचाही सहभाग आहे. या तीन मकबर्यांचा शोध नोव्हेंबर 2023 मध्ये लावण्यात आला होता व त्या वेळेपासून तिथे संशोधन सुरू होते.
या मकबर्यांची लूटही झालेली असल्याचे दिसून आले आहे. मात्र एकंदरीतच त्यांची रचना, सजावट पाहता ते संपन्न घराण्यातील मृत व्यक्तींचे आहेत, हे स्पष्ट होते. हे मकबरे सुसिस्थतीत असून त्यांच्या भिंतीवरील म्युरल्स, सजावट, मजकूर, चित्रे व नक्षीकाम अद्यापही चांगले आहे. दोन मकबर्यांमध्ये कमानी, दरवाजे, खिडक्याही आहेत. तिसरा मकबरा अतिशय वेगळ्या शैलीत रंगवलेला आहे.
Latest Marathi News चीनमध्ये 800 वर्षांपूर्वीच्या शाही मकबर्यांचा शोध Brought to You By : Bharat Live News Media.