अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आली जाग ; 10 वर्षांनी धोकादायक कट बंद
अजय कांबळे
कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतील फौजी हॉटेलसमोर अपघातात अनेकांचे जीव गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला जाग आली आहे. हॉटेलसमोरील दोन दुभाजकांमधील धोकादायक कट तब्बल 10 वर्षांनी बंद करण्यात आला आहे. मात्र, असे कट आणखी काही भागांत असून, ते कधी बंद करणार की तिथेही अणखी जीव जाण्याची वाट बघणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दौंड तालुक्यातून गेलेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाले. त्यानंतर रस्ता रुंद व मोठा झाला असून, वाहनांचा वेग प्रचंड वाढलेला आहे. परिणामी, अपघातांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महामार्गाचा कारभार सांभाळणार्या प्रशासनाला रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत कुठले गांभीर्य राहिले नसून, तातडीच्या उपाययोजनांबाबत कायम बोंबाबोंब असते. वाढत्या अपघातामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. दिवसेंदिवस ब्लॅकस्पॉट वाढत आहे. आतापर्यंत अनेक वाहनचालक, प्रवासी, नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला असून, अनेक जणांना अपंगत्व आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत पाटस टोल प्रशासन व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रशासन नेहमी कुंभकर्णी झोपेत असते.
कुरकुंभ ते मळद यादरम्यान फक्त 7 किलोमीटर अंतराचा विचार केल्यास एका महिन्यात साधारण 2 ते 3 जणांना अपघातात जीव गमवावा लागतो. दोन वर्षांत वरील टप्प्यात 50 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, तर 60 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे मागील काही घटनांतून समोर येत आहे. याव्यतिरिक्त महामार्गावर झालेल्या इतर अपघातांचा विचार केल्यास अपघाताचा आकडा बराच मोठा होईल. पुण्याहून सोलापूरकडे जाताना कुरकुंभमध्ये उड्डाणपुलाचा तीव्र उतार आणि अंधार, असे समीकरण आहे. बहुतांश वाहने भरधाव वेगात असतात. अशा धोकादायक ठिकाणी फौजी हॉटेलसमोर रस्त्याच्या दुभाजकामध्ये अंतर ठेवून कट दिला होता. येथून रस्ता ओलांडून ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. हायमास्ट लाइटसह आवश्यक उपाययोजनांबाबत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. आत्तापर्यंत तो कट वाहनचालकांच्या जिवावर बेतणारा ठरला होता. अनेक जीव गेले, अनेक जण जखमी झाले. यानंतर 10 वर्षांनी कट बंद करण्याचा निर्णय घेतला.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वारंवार अपघात घडणाऱ्या स्थळांची पाहणी करून उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक केली जाते. भुयारी मार्ग, हायमास्ट लाइट, पथदिवे, दुभाजक, स्वच्छतागृह, बसथांबा याबाबत पुन्हा सर्व्हे करावा. जिथे धोकादायक कट आहेत, ते बंद करून भुयारी मार्गाचा विचार करावा.
– दिलीप भागवत, सामाजिक कार्यकर्ते
येथेच आई-मुलाचा झाला होता मृत्यू
फौजी हॉटेलसमोर रस्त्यावर पिकअप व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला होता. जागीच ठार झालेल्या मृत महिला परांडा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका होत्या, तर उपचारांदरम्यान त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
एमआयडीसी चौकात गेला होता तिघांचा बळी
एमआयडीसी चौकातही वरीलप्रमाणे रस्त्याला कट दिला आहे. या ठिकाणी मोलमजुरी करणाऱ्या सहा जणांना भरधाव वेगातील वाहनाने धडक दिली होती. मायलेकासह अन्य एक अल्पवयीन मुलगा ठार झाला होता. अन्य तिघे जखमी झाले होते.
The post अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आली जाग ; 10 वर्षांनी धोकादायक कट बंद appeared first on पुढारी.
कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीतील फौजी हॉटेलसमोर अपघातात अनेकांचे जीव गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला जाग आली आहे. हॉटेलसमोरील दोन दुभाजकांमधील धोकादायक कट तब्बल 10 वर्षांनी बंद करण्यात आला आहे. मात्र, असे कट आणखी काही भागांत असून, ते कधी बंद करणार की तिथेही अणखी जीव जाण्याची वाट बघणार? असा प्रश्न उपस्थित …
The post अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आली जाग ; 10 वर्षांनी धोकादायक कट बंद appeared first on पुढारी.