पुणे भाजपात नाराजी; मुळीक, काकडेंची महायुतीच्या बैठका, कार्यक्रमांना दांडी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर होऊन आठवडा उलटला तरी माजी खासदार संजय काकडे आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. या दोघाही नेत्यांनी मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रम आणि बैठकांना अनुपस्थित राहून आपली नाराजी कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी मोहोळ यांच्यासमवेत मुळीक, काकडे आणि सुनील देवधर हे तीन प्रमुख इच्छुक होते. या सर्वांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. तसेच, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली होती, मात्र उमेदवारीच्या या स्पर्धेत मोहोळ यांनी बाजी मारली.
13 मार्चला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारीनंतर प्रचारालाही सुरुवात केली. मात्र, त्यांच्या प्रचारात मुळीक, काकडे आणि देवधर अद्यापही सहभागी झालेले नाहीत. त्यात देवधर यांनी मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करून आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते शहराबाहेर असल्याचे सांगण्यात आले. तर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन शहरात अभिवादन रॅली काढली. या रॅलीकडे मुळीक आणि काकडे दोघेही फिरकले नाहीत. त्यानंतर मोहोळ यांची स्वत: मुळीक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. काकडे यांच्याबाबत हेच दिसून येत आहे. यासंदर्भात या दोघाही नेत्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
मुळीक आणि काकडे या दोघांशी माझी चर्चा झाली. कोणीही नाराज नाही. मुळीक हे कुटुंबासमवेत बाहेर आहेत. त्यामुळे हे दोघेही लवकर प्रचारात सक्रिय दिसतील.
– धीरज घाटे, भाजप, शहराध्यक्ष
समर्थक-कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त
पक्षाने उमेदवारी दिली नसली तरी किमान संबधितांना विश्वासात घेतले पाहिजे. ज्यांच्यामुळे महापालिकेत एकहाती सत्ता आली, त्यांना सत्तेच्या काळातही पक्षाने काहीच दिले नाही. बाहेरून आलेल्यांना एकीकडे पक्षाकडून पदे दिली जातात, मात्र पक्षासाठी झटणार्यांना काहीच दिले जात नसल्याचे सांगत काकडे समर्थकांनी थेट नाराजी व्यक्त केली. मात्र, स्वत: काकडे यांनी पक्षाचे काम करण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
ST Bus | अकराशे चालकांची भरती करणार : प्रमोद नेहूल यांची माहिती
मानवत : वझुर खु. येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील गाव तलावांचे सौंदर्य खुलणार
Latest Marathi News पुणे भाजपात नाराजी; मुळीक, काकडेंची महायुतीच्या बैठका, कार्यक्रमांना दांडी Brought to You By : Bharat Live News Media.