निवडणूक विश्लेषणासाठी पहिल्यांदाच संगणकाचा वापर
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात टीव्ही सुरू करताच देशातील कानाकोपर्यातील मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आणि विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. इतकेच काय तर हे सारे आपल्या खिशातील स्मार्टफोनवर एक टच करताच आपण पाहू शकतो. मात्र, 1980 साली अशी कल्पना म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल म्हणा. यामुळेच 1980 ची निवडणूक तशी खास होती. टेलिप्रिंटर आणि हॉटलाईनच्या जमान्यात ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ आणि ‘यूएनआय’ या वृत्तसंस्थांनी निवडणुकांच्या निकालासाठी आणि विश्लेषणासाठी पहिल्यांदाच संगणकाचा वापर केला होता.
देशात 1980 च्या लोकसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी ‘इंटरनॅशनल डेटा मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ (आयडीएम) आणि ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’(पीटीआय)ने संगणकाचा वापर करून निवडणूक निकालाच्या कलाची तपशीलवार माहिती दिली होती. चार दिवसात संपूर्ण संगणक प्रणाली विकसित करून 6 जानेवारी 1980 रोजी संध्याकाळी 4 वाजता नेटवर्क सुरू झाले आणि ‘पीटीआय’च्या टेलिप्रिंटरवर अधिकृत निवडणूक निकाल येण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया’ ही वृत्तसंस्था मागे नव्हती. या वृत्तसंस्थेनेदेखील संगणकाचा वापर करून निवडणुकीचे विश्लेषण दिले होते.
निवडणुकीत संगणक आधारित निवडणूक विश्लेषण या नव्या पर्वाची ही सुरुवातच म्हणावी लागेल. पुढे या सार्या माहितीचा राजकीय पक्ष व नेत्यांकडून निवडणूक रणनीती आखण्यासाठी वापर केला जाऊ लागला.
हेही वाचा :
बॅलेट ते इव्हीएम… भारतीय निवडणुकांचा हायटेक प्रवास
आजपासून लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा
‘शक्ती’कडून विरोधकांचा विनाश : पंतप्रधान मोदी
Latest Marathi News निवडणूक विश्लेषणासाठी पहिल्यांदाच संगणकाचा वापर Brought to You By : Bharat Live News Media.