अभोना येथील खुनाची उकल; मारहाणीत मृतदेह जाळून काढला पळ
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
अभोणा ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारातील पुलाखालील नाल्यात ८ मार्च रोजी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी पुरुषाचा मृतदेह अर्धवट जाळला होता. ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोघा संशयित मारेकऱ्यांना अटक केली असून इतर तिघांचा शेाध घेत आहे.
शहानवाज उर्फ बबलू शेख (४६) व सादिक खान (४८, दोघे रा. जि. ठाणे) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहे. त्यांनी शहारुफ खान मेहबुब खान (रा. नवी मुंबई, मुळ रा. आझमगड, उत्तरप्रदेश) याचा खून केला होता. शहारुफ याचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटत नव्हती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने अभोना येथे तपासाची दिशा ठरवत गावात चौकशी केली. घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्री असल्याने व कळवण तालुक्यात जत्रा असल्याने अभोना ते कनाशी रोडवर गर्दी होती. त्या गर्दीत काळ्या रंगाची कार गेल्याचे पथकास समजले. त्यानुसार पथकाने तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे कारचा शोध घेत भिवंडी येथून शहानवाज व सादिकला पकडले. दोघांनी खुनाची कबुली दिली. दोघांसह इतर तिघे हे मालेगाव येथे कारची खरेदी करण्यासाठी आले होेते. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने संशयितांनी शहारुफला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्यासाठी संशयितांनी त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते फरार झाले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, नाईक विश्वनाथ काकड, हेमंत गिलबीले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
छेडछाडीला कंटाळून मारहाण
पोलिस तपासात शहारुफ हा कामानिमित्त महाराष्ट्रात आला. तो संशयित शहानवाजचा नातलग होता. शहारुफ हा महिलांची छेड काढणे, संशयितांची सतत चेष्टामस्करी करणे आदी प्रकार करत होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याने संशयितांनी त्याचा मृतदेह जाळून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
Latest Marathi News अभोना येथील खुनाची उकल; मारहाणीत मृतदेह जाळून काढला पळ Brought to You By : Bharat Live News Media.