तडका : नणंद-भावजयमध्ये लढत..!

नणंद-भावजय यांचे नाते तसे म्हटले तर खेळीमेळीचे आणि म्हटले तर नाजूक असते. दादा मला एक वहिनी आण, असे बालपणी म्हणणारी दादाची लाडकी बहीण मोठी झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष वहिनी आल्यानंतर वेगळीच वागताना दिसते. खरे तर सर्वथा अपरिचित अशा माणसांच्या सासरी, नवर्‍याचा हात धरून येणार्‍या वहिनीला त्या अपरिचित लोकांमध्ये आपल्या वयाचा आणि अत्यंत खेळकर असा पहिला चेहरा … The post तडका : नणंद-भावजयमध्ये लढत..! appeared first on पुढारी.

तडका : नणंद-भावजयमध्ये लढत..!

नणंद-भावजय यांचे नाते तसे म्हटले तर खेळीमेळीचे आणि म्हटले तर नाजूक असते. दादा मला एक वहिनी आण, असे बालपणी म्हणणारी दादाची लाडकी बहीण मोठी झाल्यानंतर आणि प्रत्यक्ष वहिनी आल्यानंतर वेगळीच वागताना दिसते. खरे तर सर्वथा अपरिचित अशा माणसांच्या सासरी, नवर्‍याचा हात धरून येणार्‍या वहिनीला त्या अपरिचित लोकांमध्ये आपल्या वयाचा आणि अत्यंत खेळकर असा पहिला चेहरा दिसतो तो म्हणजे नणंदेचा. ही तिची सासरी असलेली पहिली मैत्रीण असते आणि बहुतांश ठिकाणी हे नाते असेच मैत्रीचे, त्याचबरोबर नणंद आणि भावजय म्हणून पण जपले जाते.
काही घरांमध्ये मात्र नणंद आणि भावजय एकमेकींच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या दिसतील. एकाच घरामध्ये राहत असलेल्या नणंद-भावजयी आपले मूळ नाते विसरून परस्परांच्या विरोधात उभ्या राहत आहेत, हे चित्र महाराष्ट्रात आजकाल पाहायला मिळत आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात होणारी ही ‘फाईट’ राज्यभरात आधीपासूनच गाजत आहे. सर्वसाधारणतः नणंद आणि भावजय यांचा संबंध दोघींची लग्ने झाल्यानंतर फारसा येत नाही; कारण नणंद आपल्या घरी नांदत असते आणि भावजय ही तिच्या घरी नांदत असते. इथे चित्र थोडे वेगळे आहे. म्हणजे वडिलांची वारसदार नणंद असून, ती वडिलांच्या सोबत राहत आहे आणि त्याच एकत्र कुटुंबात एक वहिनी आहे, तिचा पती म्हणजे दादा हा मोठा पॉवरफुल राजकारणी आहे. मतदारसंघ तर बदलता येत नाही; कारण दादा आणि ताई यांनी त्याच मतदारसंघात काम केलेले आहे. निवडणूक लोकसभेची आहे म्हणजेच खासदारकीची आहे. त्यासाठी ठरल्याप्रमाणे गेली कित्येक वर्षे ताई प्रतिनिधित्व करत आहेत. ताईंना निवडून आणण्याचे काम आतापर्यंत दादाच करत होत; पण गेल्या वर्षात सगळेच काही बदलून गेले.
दादा घराबाहेर पडला आणि जाताना पक्ष सोबत घेऊन गेला. नणंद वडिलांच्या बरोबर घरीच राहिली आणि उरलेल्या पक्षाची मुख्य नेता झाली. इथे थेट नणंद-भावजय एकमेकींच्या विरोधात लढणार आहेत.
एकंदरीत विचार केला तर भावकी ही त्रास देणारीच असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भावकी आपल्यासारख्या सामान्य लोकांची असो की थोरामोठ्यांची असो, शेतीच्या वादावरून एकमेकांचे डोके फोडणारे सख्खे भाऊच असतात. भावकीमध्ये कुणाचे चांगले झालेले कुणाला बघवत नाही. त्यामुळे एकमेकांबद्दल एक प्रकारची असूया सतत कार्यरत असते. चांगल्या-चांगल्या कुटुंबाची यात वाताहत होते.
निवडणूक म्हणजे लोकशाहीतील एक उत्सव समजला जातो. राज्यामध्ये अनेक ठिकाणी घराघरांतील संघर्ष पाहायला मिळत आहे. काका-पुतण्या संघर्ष महाभारत काळापासून सुरू आहे, तो आजही तसाच आणि त्याच तीव—तेने राजकारणामध्ये पण आहे. सासरा विरुद्ध सून हा संघर्षही खानदेशामधील एका मतदारसंघात पाहायला मिळत आहे. थकलेला आणि पक्ष सोडलेला सासरा आणि त्याच पक्षावर निष्ठा ठेवून राहिलेली सून हे या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. एकंदरीत लोकशाहीचा हा उत्सव संघर्षाचा न होवो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.
Latest Marathi News तडका : नणंद-भावजयमध्ये लढत..! Brought to You By : Bharat Live News Media.