कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात
अंबादास बेनुस्कर; पुढारी वृत्तसेवा
खानदेशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या आमळी (ता.साक्री,जि.धुळे) येथील श्री कन्हय्यालाल महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवास कार्तिकी एकादशीनिमित्त आज गुरुवार (ता.23) पासून सुरवात होत आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. राज्यासह लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशातून पायी दिंडया दाखल झाल्याने यात्रास्थळी भक्तीचा झरा वाहत आहे.
तीन दिवसांची यात्रा असली तरी तीचे गुरुवार आणि शुक्रवार (ता.24) असे मुख्य दोन दिवस असतात. या काळात कोट्यवधींची उलाढाल होते. यात्रास्थळी तीन दिवसांत तब्बल दहा लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात, दर्शनासाठी श्री कन्हय्यालाल महाराजांचे मंदिर चोवीस तास खुले राहील. पहिल्याच दिवशी एकादशीला लाखो भाविक हजेरी लावतील. यादृष्टीने मंदिर व्यवस्थापनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. आदिवासीबहुल भागात निसर्गरम्य टेकडीवर वसलेले श्रीक्षेत्र आमळी यात्रोत्सवामुळे भक्तिभावात चिंब झाले आहे.
Tata Technologies IPO | टाटांची कमाल! ‘आयपीओ’वर गुंतवणूदारांच्या उड्या, मिळवले ८.९५ पट सबस्क्रिप्शन
भावणारे पर्यटनस्थळ
राज्यासह परराज्यातील भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. मंदिर व यात्रोत्सव परिसरात चोवीस तास पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या आमळीची धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख आहे. त्यामुळे वर्षभर धार्मिक पर्यटनानिमित्त भाविक आमळीत येत असतात. पश्चिमेस दोन किलोमीटरवर निसर्गरम्य अलालदरीचा देखणा परिसर, धबधबे आहेत. त्यामुळेही देशभरातून भाविक आमळीत येत असतात. दोन्ही ठिकाणी सध्या भाविक पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
भक्तिमय वातावरण
मंदिर परिसरात भजन व टाळ मृदंगांचा गजर तर श्री कन्हय्यालाल महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला आहे. यात्रा कालावधीत दिवसरात्र लाखो भाविक दर्शनासह नवसपूतों व खरेदीसाठी गर्दी करतात, श्रावणातही मंदिरस्थळी यात्रेचे स्वरूप असते. मंदिराच्या पहिल्या पायरीजकर जुनी विहीर व दोन तलाव आहेत. उत्तरेकडे घनसरा टेकडी असून, परिसरात श्री गणपती, श्री महादेव, श्री मारुती, श्री पाववा देव अशी अकरा मंदिरे आहेत. परिसरातच मालनगाव, कावन्याखडक धरण आहे. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराचे नवीन काम व भक्तनिवास, संरक्षण भिंत आदी कामे सुरू आहेत.
व्यावसायिक दाखल
कडाक्याची थंडी आणि झोंबणारे गार वारे वाहत असतानाही यात्रोत्सवासाठी गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दाखल झाले आहेत. पूजासाहित्यासह विविध खेळणी, खाद्यपदार्थ, संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाच्या साधनातील उंच पाळणे, नारळ, केळी, आनस, शीतपेय, कपड़े-कापड, स्वेटर आदी निरनिराळे विक्रेते मुक्कामी आहेत.
Punjab News : पंजाबमधील गुरूद्वारात निहंग शिख आणि पोलिसांत धुमश्चक्री; पोलिसाचा मृत्यू, ३ जखमी
काळ्या पाषाणाची शेषशाही निद्रावस्थेतील मूर्ती
श्री कन्हय्यालाल महाराजांचे मंदिर पुरातन असून, ते 1614 मध्ये स्थापन झाले आहे. श्री कन्हय्यालाल महाराज भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्वाभिमुख सिंहासनावर कन्हय्यालाल महाराजांची काळ्या पाषाणाची शेषशाही निद्रावस्थेतील मूर्ती आहे. अशी मूर्ती राज्यात अन्यत्र कुठेही नाही. या मूर्तीला कायमच ओलावा असतो. सूर्याचे पहिले किरण मूतींवर येते अशी मंदिराची रचना आहे. 16 व्या शतकात मुल्हेर (ता.बागलाण) येथील तांबेदास राजांच्या स्वप्नात श्री कन्हय्यालाल महाराज गेले. त्यांनी माझी मूर्ती गुजरातमधील डाकोरजी येथील तलावात आहे, असे सांगितले. तेथून मला मुल्हेरला आणावे, त्यासाठी आधी मंदिर बांधावे असेही सांगितले. त्याप्रमाणे राजा आणि सैनिक मूर्ती घेण्यासाठी गेले. मात्र, डाकोरजीपासून थेट मुल्हेरपर्यंत कुठेही थांबू नये, अशी अटही महाराजांना घातली गेली होती. आमळी परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहून सैन्याने पालखी तेथे धांबविली. त्यामुळे श्री कन्हय्यालाल महाराज आमळी येथेच थांबले. मूर्ती जमिनीवर ठेवली, ती उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मग बरीच वर्षे गेल्यानंतर श्री पावबा नावाच्या गुराख्याने येथे मंदिर बांधले, अशी आख्यायिका आहे.
कसे पोहचाल “आमळीला’?
नागपूर-सुरत महामार्गावरील कोंडाईबारीपासून पश्चिमेला 13 किलोमीटरवर आमळी आहे. कोडाईबारी व दहिवेल येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा आहे. यात्रोत्सवासाठी साक्री, नवापूर स्थानकांवरून जादा एसटी बस सोडण्यात येत आहेत.
The post कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.
खानदेशातीलच नव्हे, तर महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील भाविकांची अपार श्रद्धा असलेल्या आमळी (ता.साक्री,जि.धुळे) येथील श्री कन्हय्यालाल महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवास कार्तिकी एकादशीनिमित्त आज गुरुवार (ता.23) पासून सुरवात होत आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. राज्यासह लगतच्या गुजरात, मध्य प्रदेशातून पायी दिंडया दाखल झाल्याने यात्रास्थळी भक्तीचा झरा वाहत …
The post कन्हय्यालाल महाराज यात्रोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.