दक्षिणेत बेरजेच्या राजकारणाकडे कल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एनडीएला बळकटी देण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. नितीशकुमार यांच्या जेडीयूने एनडीएत अगोदरच मुक्काम हलविला आहे आणि नवीन पटनायक यांचा बीजेडीही एनडीएत येण्याची शक्यता आहे. तसेच भाजपने दक्षिण भारतातील प्रमुख राज्य आंध्र प्रदेशात मोठा डाव खेळला. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला एनडीएमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अखेर चंद्राबाबू यांनी गृहमंत्री अमित शहा … The post दक्षिणेत बेरजेच्या राजकारणाकडे कल appeared first on पुढारी.

दक्षिणेत बेरजेच्या राजकारणाकडे कल

अमित शुक्ल, राजकीय अभ्यासक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एनडीएला बळकटी देण्याचे कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. नितीशकुमार यांच्या जेडीयूने एनडीएत अगोदरच मुक्काम हलविला आहे आणि नवीन पटनायक यांचा बीजेडीही एनडीएत येण्याची शक्यता आहे. तसेच भाजपने दक्षिण भारतातील प्रमुख राज्य आंध्र प्रदेशात मोठा डाव खेळला. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला एनडीएमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. अखेर चंद्राबाबू यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यावर शिक्कामोर्बत झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा भाजपला 370 प्लस आणि एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळवण्याची घोषणा केली आहे. यासाठी भाजपकडून दक्षिण भारतावर विशेष लक्ष दिले जात आहे. या कारणामुळेच पंतप्रधान मोदी यांनी अलीकडच्या काळात दक्षिण भारतात दौरे केले. भाजपकडून बर्‍याच काळापासून प्रयत्न केले जात असतानाही कर्नाटक वगळता अन्य ठिकाणी फारसे यश आले नाही. गेल्या निवडणुकीत कर्नाटक वगळता भाजपला तेलगंणात केवळ चार जागा मिळाल्या. दक्षिण भारतातील पाच राज्यांतील 127 जागांचा विचार केला तर भाजपकडे केवळ 29 जागा आल्या आणि त्यापैकी 25 जागा कर्नाटकातील होत्या. दक्षिण भारतात राजकीय स्थिती मजबूत करण्यासाठी भाजपने आता आंध्र प्रदेशवर लक्ष केंद्रित केले आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीसमवेत आघाडी करताना विधानसभेच्या 30 आणि लोकसभेच्या सात जागांची मागणी केली; मात्र तिन्ही पक्षांतील झालेल्या करारानुसार आंध्र प्रदेशातील 25 पैकी 17 जागांवर टीडीपी, सहा जागांवर भाजप आणि दोन जागांवर जनसेना निवडणूक लढवेल. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. त्यात175 पैकी तेलगू देसम 144, तर भाजप 10 आणि जनसेना 21 जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे ठरविले आहे. भाजप सूत्रांच्या मते, यावेळी पक्षाने दक्षिण भारतातील 84 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
पक्षाला 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी दक्षिण भारतातील जागा महत्त्वाच्या ठरणार आहेत. वास्तविक टीडीपी आणि भाजप यांच्यात यापूर्वी युती होतीच; पण 6 वर्षांपूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएपासून फारकत घेतली. आता त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आहे. गेल्या जानेवारी महिन्यात नायडू यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेत चर्चा केली आणि कालांतराने ‘टीडीपी’चा एनडीएत सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला. ओडिशात सत्तारूढ बीजू जनता दलाने (बीजेडी) लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपशी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. बीजेडीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांच्यासह बीजेडीचे नेते एका बैठकीसाठी दिल्लीत एकत्र झाले आणि त्यात आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षांत होणारा संभाव्य करार हा राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण होणार्‍या बदलांचे प्रतीक आहे. प्रामुख्याने 15 वर्षांपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बीजेडीने अंग काढून घेतले. बीजेडीचे उपाध्यक्ष आमदार देवीप्रसाद मिश्रा यांनी यासंदर्भातील चर्चेला दुजोरा दिला; मात्र आघाडीबाबत मत व्यक्त केले नाही.
मिश्रा यांनी नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आघाडीचा निर्णय घेताना बीजेडी ओडिशाच्या जनतेचे व्यापक हित लक्षात घेईल. आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. बीजेडीकडून जारी निवेदनात म्हटले आहे की, बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आणि 2036 मध्ये ओडिशा स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत बीजेडी आणि मुख्यमंत्री पटनायक यांना अनेक महत्त्वाचे टप्पे पार करायचे आहेत. त्यामुळेच बीजेडी ओडिशा जनतेच्या व्यापक हिताच्या द़ृष्टीने सर्वकाही करेल. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार ज्योएल ओराम यांनी दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्यासमवेतच्या बैठकीनंतर बीजेडीसमवेतच्या निवडणूकपूर्व आघाडीच्या चर्चेला दुजोरा दिला; मात्र अंतिम निर्णय पक्षाचे श्रेष्ठी घेतील, असेही सांगितले.
ओडिशात 21 लोकसभा आणि 147 विधानसभेच्या जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला ओडिशाचे राजकीयद़ृष्ट्या महत्त्व नाकारता येत नाही. 2019 च्या निवडणुकीत बीजेडी आणि भाजपने अनुक्रमे 12 आणि 8 जागा जिंकल्या होत्या, तर विधानसभेत 112 आणि 23 जागा जिंकल्या. सूत्रांनुसार आघाडीच्या स्थितीत भाजप अधिकाधिक लोकसभेच्या जागा जिंकेल आणि विधानसभेला बीजेडी लक्ष केंद्रित करेल. आघाडीच्या चर्चेला बळ मिळण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पटनायक यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केलेली स्तुती होय. बीजेडीने संसदेत मोदी सरकारच्या अजेंड्याला पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीत बीजेडीने अधिक जागांवर भर दिला आहे. त्याने 147 पैकी 105 जागा लढण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार भाजपला 42 जागा राहतील. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या 21 लोकसभा जागांपैकी 13-14 जागांवर भाजप निवडणूक लढवेल. 1999 पासून आतापर्यंत बीजेडी-भाजप आघाडीला ओडिशाच्या दोन विधानसभा निवडणुकांत आणि तीन लोकसभा निवडणुकांत यश मिळाले आहे. फेब्रुवारी 1998 मध्ये आघाडीची पायाभरणी मजबूत झाली. दोन्ही पक्षांनी 1998, 1999 आणि 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबरच 2000 आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकांत चांगले यश मिळवले.
Latest Marathi News दक्षिणेत बेरजेच्या राजकारणाकडे कल Brought to You By : Bharat Live News Media.