Pune Loksabha : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वसंत मोरेंची फिल्डिंग !

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून थेट काँग्रेसच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा मिळविण्याचे मोरे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मनसेकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी मोरे हे इच्छुक होते. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडीला वैतागून त्यांनी गेल्या आठवड्याला मनसेला रामराम ठोकला. त्यानंतरही लोकसभा निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर मोरे ठाम आहेत. मनसे सोडल्यानंतर त्यांना विविध राजकीय पक्षांकडून ऑफर आल्या आहेत.
त्यात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे मोरे नक्की कोणत्या पक्षात जाणार? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर ही जागा मिळविण्याचे मोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. पवार यांच्या भेटीतही उमेदवारी मिळविण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे शब्द टाकावा, अशी विनंती केली होती; त्यावर पवारांनी तो निर्णय काँंग्रेसचा असेल, असे सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी दिली. तर, राऊत यांच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. दरम्यान, यासंदर्भात मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कुरघोडीचे राजकारण
पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, अरविंद शिंदे, आबा बागूल हे प्रमुख इच्छुक आहेत. त्यात धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे धंगेकर यांचा पत्ता कट करण्यासाठी पक्षांतील काही मंडळींनी थेट वसंत मोरे यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर आत्ता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? यावर काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
हेही वाचा
सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार!
कोल्हापूर : भीषण अपघात! वाठार फ्लायओव्हर जवळ ट्रकने मजुरांना चिरडले, ४ ठार तर ८ गंभीर
Lok Sabha Election 2024 : भाजपला सत्तेतून तडीपार करणार; उद्धव ठाकरे यांचा इशारा
Latest Marathi News Pune Loksabha : काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वसंत मोरेंची फिल्डिंग ! Brought to You By : Bharat Live News Media.
