कस्तुरीचा चिखल करून बांधली होती हवेली!

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : जगातील सर्वाधिक दुर्मीळ आणि सुगंधी म्हणून ओळखल्या जाणार्या कस्तुरीचे नाव तर बहुतेकांना माहीत असणारच. आज नैसर्गिक कस्तुरी मिळणे अत्यंत दुर्मीळ व महागडी आहे. एक ग्रॅम कस्तुरीची चालू बाजारभावानुसार किंमत आहे तब्बल तीन लाख रुपये! अशा या मुलखावेगळ्या दुर्मीळ कस्तुरीचा चिखल करून एका अवलियाने अख्खी हवेली बांधली होती, असे सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही; पण ते सत्य आहे आणि विशेष म्हणजे ती हवेली आपल्या महाराष्ट्रातच आहे. ते गाव म्हणजे वाशिम जिल्ह्यातील कारंजा!
देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, इमादशाही, नागपूरकर भोसले यांच्यापासून इंग्रज राजवटीपर्यंतचा काळ या शहराने अनुभवला आहे. अशा या कारंजा गावात साधारणत: 500 वर्षांपूर्वी लेकूर संघई नावाचे एक बडे व्यापारी राहत होते. या लेकूर संघई यांनी त्यावेळी आपल्या नव्या हवेलीच्या बांधकामाला सुरुवात केली होती. याच दरम्यान एक अत्तरांचा व्यापारी 50 उंटांच्या पाठीवर शेकडो किलो कस्तुरी लादून ती घेऊन जात होता. सगळ्या रस्त्यावर आणि कारंजा गावात या कस्तुरीचा दरवळ दाटून राहिला होता. सहज म्हणून लेकूर संघई यांनी त्या व्यापार्याकडे कस्तुरीच्या किमतीबाबत चौकशी केली; पण त्या व्यापार्याने त्यांची खिल्ली उडविली. हा फाटक्या कपड्यातील माणूस काय कस्तुरी घेणार, असे त्याला वाटले.
मग मात्र लेकूर संघई इरेला पेटले आणि त्यांनी 50 उंटांच्या पाठीवर लादलेली सगळीच्या सगळी कस्तुरी जाग्यावर खरेदी केली. त्या व्यापार्याला अकबरकालीन सोन्याची नाणी देऊन वाटेला लावले. आता या एवढ्या प्रचंड कस्तुरीचे लेकूर संघईंनी काय केले असेल… तर ती सगळी कस्तुरी त्यांनी चक्क हवेली बांधण्यासाठी केलेल्या चिखलात टाकली आणि या कस्तुरीच्या चिखल्याने आपली पाच मजली हवेली बांधली. कित्येक वर्षे या हवेलीतून कस्तुरीचा सुगंध दरवळत होता. कालांतराने संघई घराण्याची ती ओळखच बनली आणि कस्तुरीवाले संघई अशी त्यांची ओळख बनली. आज लेकूर संघई यांची 19 वी पिढी कारंजा गावात राहते आहे. किरण संघई कस्तुरीवाले हे या पिढीतील त्यांचे वंशज असून, आजही ते कारंजा शहरात राहतात. आज ही हवली नामशेष झाली आहे, हवेलीच्या जागेवर केवळ मातीचे ढिगारे उरले आहेत; पण कस्तुरीची हवेली म्हणून तिची ओळख कायम आहे.
मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास..!
कस्तुरी हा हिमालयीन पर्वतरांगांमध्ये आढळून येणार्या कस्तुरीमृग प्रजातीतील हरणाच्या नाभीपासून उत्पन्न होणारा एक सुगंधी पदार्थ आहे. या प्रकारचा सुगंध काही वनस्पतींपासूनही मिळतो. आजकाल रासायनिक प्रयोगातून कृत्रिमरीत्या कस्तुरी मिळविली जाते. कस्तुरीमृगातील नरांच्या बेंबीमध्ये नैसर्गिक कस्तुरी आढळून येते. तीन वर्षांहून जास्त वयाच्या नराच्या बेंबीजवळ त्वचेखाली कस्तुरी-ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी व मेणासारखा स्राव पाझरतो आणि एका पिशवीत जमा होतो. ताजेपणी त्याला उग्र दुर्गंधी असते; पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो. हीच ती कस्तुरी.
Latest Marathi News कस्तुरीचा चिखल करून बांधली होती हवेली! Brought to You By : Bharat Live News Media.
