दिल्लीत दुरंगी लढत
प्रशांत वाघाये,
दिल्ली : दिल्लीतील सर्व सातही लोकसभेच्या जागा भाजपकडे आहेत. मात्र, दिल्ली विधानसभा आणि दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील लढत ही भाजपविरुद्ध काँग्रेस आणि ‘आप’ अशी होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व उमेदवार जाहीर करून आपली तयारी दाखवून दिली आहे. भाजपला ‘आप’ आणि काँग्रेसचे आव्हान असणार आहे. काँग्रेस आणि ‘आप’चे उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत. कधी काळी शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती आणि दिल्लीतील लोकसभांच्या जागांमध्येही काँग्रेसचे वजन होते. मात्र, 2014 मध्ये देशात सत्ता बदल झाला आणि दिल्लीतील सर्व लोकसभेच्या जागा भाजपने काबीज केल्या. आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र आहेत. दोन्ही पक्षांत काही मतभेद असले, तरी ते एकत्र भाजपला टक्कर देणार आहेत. त्यामुळे यापूर्वी झालेल्या तिरंगी लढती आगामी लोकसभा निवडणुकीत दुरंगीच होणार आहेत. दिल्ली विधानसभेत आणि महानगरपालिकांमध्ये अरविंद केजरीवाल यांची चाललेली जादू लोकसभेत चालणार का? की मोदींचा करिष्मा पुन्हा भाजपला दिल्लीत तारणार, हे आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
16 व्या आणि 17 व्या लोकसभेत (2014 ते 2024) दिल्लीतील सातपैकी सात लोकसभा भाजपने जिंकल्या आहेत. विद्यमान खासदारांमध्ये चांदणी चौक लोकसभा क्षेत्रातून माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, उत्तर पूर्व दिल्लीतून माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर, नवी दिल्लीतून विद्यमान केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, उत्तर पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा, तर दक्षिण दिल्लीतून रमेश बिदुरी यांचा समावेश आहे. मात्र, या सातपैकी मनोज तिवारी वगळता सर्व खासदारांना भाजपने वगळले आहे. भाजपने चांदणी चौकातून प्रवीण खंडेलवाल, पूर्व दिल्ली लोकसभा क्षेत्रातून हर्ष मल्होत्रा, नवी दिल्लीतून सुषमा स्वराज यांच्या कन्या बान्सुरी स्वराज, उत्तर पश्चिम दिल्लीतून योगेंद्र चंदोलिया, पश्चिम दिल्लीतून कमलजित सेहरावत, दक्षिण दिल्लीतून रामवीरसिंग बिधुरी अशा नव्यांना उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
Latest Marathi News दिल्लीत दुरंगी लढत Brought to You By : Bharat Live News Media.