भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राणा दांपत्याला गप्प बसवावं, अन्यथा महायुतीवर परिणाम : माजी आमदार अभिजीत अडसूळ
अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राणा दांपत्याचे कान खेचून त्यांना एका ठिकाणी गप्प बसवावे, अन्यथा त्याचे परिणाम भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर होतील असा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी रविवारी (दि.१७) दिला आहे.
युवा स्वाभिमान पक्षाच्या शनिवारी (दि.१६) झालेल्या मेळाव्यात आमदार रवी राणा यांनी एनडीए च्या सर्व घटक पक्षांना जबरदस्ती एकाच स्टेजवर आणू, अशा प्रकारची वल्गना केली. मात्र मी त्याला भीक घालत नाही, असे सांगत अडसूळ यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रात आणि देशात युती ही भाजप आणि शिवसेनेची आहे. युवा स्वाभिमानची युती नाही. भाजप आणि शिवसेनेचा जास्त वाटा आहे. आमचे संबंध हे वेगळे आहेत. मात्र हे संबंध खराब करण्याचे काम अशा प्रकारच्या वल्गना करून रवी राणा हे करू इच्छितात, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अद्याप यायचा आहे. देशातील कोट्यावधी लोकांचा विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे. मात्र, नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे अशा मेळाव्यातून बोलताना निकाल त्यांच्याच बाजूने लागेल या अविर्भावात दिसून आहेत. निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असा चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे. याचा नकारात्मक परिणाम आगामी काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणा दांपत्यावर कारवाई होणे आवश्यक असून भाजपच्या नेत्यांनी यावर विचार करावा, अशी मागणी माजी आमदार अडसूळ यांनी केली आहे.
काय आहे राणा-अडसूळ वाद
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून पराभव केला होता. तेव्हापासून राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात आनंदराव अडसूळ यांनीच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तो निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नवनीत राणा या लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांचा विरोध आहे. अमरावतीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर लढल्यास एक वेळ राजकारण सोडू पण त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका आनंदराव अडसूळ यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये भविष्यात चांगलाच वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीने येथील उमेदवार अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरचा उमेदवार जाहीर होताच नवा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Latest Marathi News भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राणा दांपत्याला गप्प बसवावं, अन्यथा महायुतीवर परिणाम : माजी आमदार अभिजीत अडसूळ Brought to You By : Bharat Live News Media.