छत्रपती संभाजीनगर : साजापूर येथे लघुउद्योजकाची गोळी झाडून हत्या
वाळूज महानगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : बालाजीनगरात आज (दि. १७) रात्री उशिरा लघुउद्योजकांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीने धुळे-सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी परिसर पिंजून काढला. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री ८ वाजेच्या सुमारास साजापूर येथील बालाजीनगरात घडली. गोळीबाराच्या या घटनेमुळे वाळूज महानगरात खळबळ उडाली आहे.
सचिन साहेबराव नरोडे (३५, रा. शिल्लेगाव, ता. गंगापूर, ह.मु. गट नंबर ३८, बालाजीनगर, साजापूर) असे हत्या झालेल्या लघुउद्योजकाचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
सचिन नरोडे हे चार- पाच वर्षापासून साजापूर येथील बालाजीनगरात आई शोभाबाई, वडील साहेबराव व मुलगी स्वरांजली (११) यांच्यासोबत राहत होते. सचिन यांचे वडगाव शिवारात एक छोटे युनिट असून मागील वर्षभरापासून ते बंद आहे. रविवारी रात्री सचिन यांच्या मोबाईलवर एकाचा फोन आला. रात्री आठ वाजेच्या सुमारास ते घरापासून १५० ते २०० मीटर अंतर असलेल्या एका रिकाम्या प्लॉटजवळ गेले. या भागात ग्रामपंचायत मार्फत जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरु आहे. त्यात वायर कटल्यामुळे या परिसारातील वीज बंद होती. त्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. दरम्यान सचिन हे रिकाम्या प्लॉट जवळ जाताच मारेकऱ्याने सचिन यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डोक्यात घुसली. त्यामुळे सचिन हे क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येवून पाहिले असतासचिन नरोडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याचवेळी दुचाकीवरून अंधाराचा फायदा घेवून मारेकरी पसार झाले.
पोलिसांनी परिसर काढला पिंजून
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप शिंदे, अशोक इंगोले हे घटनास्थळी धावले. त्याचवेळी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे व त्यांच्या सहकारी घटनास्थळी गेले. त्यांना सचिन नरोडे यांच्या डोक्यात गोळी लागून त्यांच्या कानातून रक्तश्राव झाल्याचे दिसले. यावेळी श्वान रॉकीच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या सुचना केल्या.
दोन महिन्यांपूर्वी जाळली होती कार
सचिन नरोडे यांचे वडील साहेबराव नराडे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. सचिन हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सचिन हे विवाहित होते, मात्र पत्नी सोबत राहत नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सचिन यांची कार जाळली होती. त्यांची त्यांनी एमआयडीसी वाळूज ठाण्यात तक्रारही दिलेली आहे.
Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : साजापूर येथे लघुउद्योजकाची गोळी झाडून हत्या Brought to You By : Bharat Live News Media.