हिंगोली: कांडली येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले
आखाडा बाळापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. ही घटना आज (दि.१७) सकाळी नांदेड- हिंगोली महामार्गावरील वारंगा फाटा शिवारामध्ये घडली. चंद्रकांत अजबराव पतंगे (वय २५, रा. कांडली, ता. कळमनुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कांडली येथील चंद्रकांत हा तरुण आज सकाळी पाच वाजता आईला मॉर्निंग वॉकला जातो म्हणून घराबाहेर पडला होता. दरम्यान, नांदेड- हिंगोली महामार्गावर वारंगा फाटा शिवारामध्ये एका विहिरीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली.
आखडा बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीच्या बाहेर सकाळी साडेअकरा वाजता काढण्यात आला. डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. विनोद अतकुरकर यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. तरुणाच्या खिशात मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याची चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आई आज मी तुला आणि वैभवला सोडून दूर जात आहे. बाबा गेल्यानंतर खूप काही केलंस माझ्यासाठी, मी शिकून मोठा व्हावं, हे स्वप्न मी मराठा आरक्षणामुळे पूर्ण करू शकलो नाही. काल आचारसंहिता लागल्यापासून मला कळून चुकलंय हे सरकार आरक्षण देणार नाही. आई, मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही.
मला माफ कर, वैभवला सांभाळ, असा मजकूर चंद्रकांत यांने पत्रात लिहिला आहे.
हेही वाचा
हिंगोली : बेपत्ता मुलाचा तलावात सापडला मृतदेह
हिंगोलीत अल्पवयीन मुलाचे अपहरण गुन्हा दाखल
हिंगोली : मिनी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची २ लाखाची फसवणूक
Latest Marathi News हिंगोली: कांडली येथील तरुणाने मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले Brought to You By : Bharat Live News Media.