यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातच रंगणार सामना
यवतमाळ: Bharat Live News Media वृत्तसेवा; अखेर काल १६ मार्च रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची दरवेळीच देशभर चर्चा होते. यावेळी मात्र वेगळ्याच कारणाने यवतमाळ लोकसभा निवडणुकीची चर्चा रंगणार आहे. त्याचे कारण शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेसेना) या पक्षाकडून विद्यमान खासदार भावनाताई गवळी यांची उमेदवारी निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदार संघात शिवसेना विरुध्द शिवसेना असा सामना पाहण्याची वेळ शिवसैनिकांसह समस्त मतदारांवर येणार आहे. (Lok Sabha Election 2024)
याशिवाय यवतमाळ जिल्हा हा तीन लोकसभा मतदार संघात विभागला असून, जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र (६ तालुके) चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्रात मोडतात. तर एक विधानसभा क्षेत्र (२ तालुके) हिंगोली-उमरखेड लोकसभा क्षेत्रात मोडतात चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदार संघातून भाजपाने महायुतीचे उमेदवार म्हणुन राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी घोषित केली आहे. या मतदार संघातून महाविकास आघाडीने अद्यापही उमेदवाराचे नाव घोषित केले नाही. हिंगोली – उमरखेड मतदारसंघाची हिच स्थिती असून, या मतदार संघातून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. (Lok Sabha Election 2024)
मागील दोन-तीन महिण्यापासून सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असतांना यावेळीची लोकसभा निवडणुक कशी होईल याबाबतची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य जनतेसह राजकारणी व पक्षीय कार्यकर्त्यांनाही लागलेली आहे. दरम्यान शनिवारी निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडणार आहे. यामुळे निवडणुक कधी लागणार या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांना मिळाले आहे. आता मतदार संघातील संपुर्ण जनतेचे लक्ष महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराकडे लागले आहे. (Lok Sabha Election 2024)
महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वाट्याला यवतमाळ-वाशिम मतदार संघ आला आहे. त्यानुसार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्या मतदार संघात जवळपास सहा ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. या सभांमध्ये ठाकरे शिवसेनेचा उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख हेच राहतील अशी घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली आहे. या उलट महायुतीमधून उमेदवाराची अद्यापही अनिश्चितता कायम आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेच्या वाट्याला गेला असून विद्यमान खासदार भावना गवळी या उमेदवारीसाठी प्रचंड आटापिटा करत आहे. मात्र महायुतीमधील मुख्यपक्ष भाजपच्या भावना गवळी यांच्या नावावर अद्यापही होकार मिळालेला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा विद्यमान मंत्री संजय राठोड यांनी लढवावी असा आग्रह सुरु आहे. संजय राठोड यांनी लोकसभेत आपल्याला रस नसल्याचे सांगुन स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे शेवटच्या घटकेला भावना गवळींना उमेदवारी देण्याशिवाय शिंदे शिवसेनेकडे सध्यातरी कोणताही सक्षम पर्याय दिसत नाही आहे. (Lok Sabha Election 2024)
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघासोबतच जिल्ह्यातील जनतेला चंद्रपूर-आर्णी आणि हिंगोली-उमरखेड या दोन मतदार संघातील निवडीकडे व महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार घोषणेकडे संपुर्ण मतदाराचे व राजकीय नेते कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. चंद्रपूर-आर्णी हा मतदार संघ महाविकास आघाडीतून कॉंगे्रसच्या वाट्याला गेला असून येथून दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर या उमेदवारी मागत आहे. तसेच राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी विजय वडेट्टीवार ही सुध्दा लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहे. या मतदार संघातून भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहिर केली आहे. हिंगोली-उमरखेड मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदेसेनेच्या वाट्याला गेला आहे येथून महायुतीद्वारे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. (Lok Sabha Election 2024)
Latest Marathi News यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटातच रंगणार सामना Brought to You By : Bharat Live News Media.