रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गिते लढत

कोकण डायरी : शशी सावंत रायगड जिल्हा सात विधानसभा मतदार संघांचा असला तरी, या जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात, तर तीन विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघात आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील मतदानही दोन टप्प्यात होणार आहे. रायगड लोकसभेची ७ मे ला तर मावळ लोकसभेचे १३ मे ला मतदान होणार आहे. … The post रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गिते लढत appeared first on पुढारी.

रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गिते लढत

कोकण डायरी : शशी सावंत
रायगड जिल्हा सात विधानसभा मतदार संघांचा असला तरी, या जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ रायगड लोकसभा मतदार संघात, तर तीन विधानसभा मतदार संघ मावळ लोकसभा मतदार संघात आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील मतदानही दोन टप्प्यात होणार आहे. रायगड लोकसभेची ७ मे ला तर मावळ लोकसभेचे १३ मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे दक्षिण रायगडला आणि उत्तर रायगडला वेगवेगळ्या राजकीय समीकरणांचा सामना करावा लागणार आहे. रायगड लोकसभेला सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तर मावळमध्ये श्रीरंग बारणे खासदार आहेत. एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर एक शिवसेना शिंदे गटाचे खासदार पुन्हा रिंगणात उतरले असून त्यांना महाविकास आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. (Lok Sabha Election 2024)
मागील दोन लोकसभा निवडणुकीत एकमेकाला पराभूत करून विजयी झालेले गीते- तटकरे यांच्यात आता २०२४ ला तिसऱ्यांदा लक्षवेधी लढत होत आहे. २०१४ मध्ये अनंत गीतेंनी सुनील तटकरेंना अवघ्या २००० मतांनी पराभूत केले होते. मात्र या पराभवाचा वचपा काढत २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या अनंत गीते यांचा २५,००० मताधिक्क्याने पराभव केला होता. या तटकरेंच्या विजयात रायगडमध्ये पाय रोवून असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा मोठा वाटा होता. (Lok Sabha Election 2024)
आता कालपरत्वे राजकीय स्थिती बदलली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीत आले आहेत. तर महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीत आले आहेत. ही किमया सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिपाक आहे. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीत ज्या शेतकरी कामगार पक्षाने अनंत गीतेंना पराभूत केले, तोच शेतकरी कामगार पक्ष आज २०२४ मध्ये अनंत गितेंच्या विजयासाठी कंबर कसून उभा आहे. सुनील तटकरे किंवा आदिती तटकरे या रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अनंत गीते यांनी गेल्या महिनाभरापासून प्रचार सुरू केला आहे. (Lok Sabha Election 2024)
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे २०१९ ला विजयी झालेले तिन्ही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोंबत आहेत. त्यांनी शिवसेना सोडण्याचे कारण तटकरेंच्या कार्यपद्धतीचे दिले होते. मात्र आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनीच सुनील तटकरे लोकसभेला हवे म्हणून मागणी लावून धरली आहे. हा काळाचा महिमा आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड असे चार विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर असे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात एकूण १६ लाख मतदार आहेत. सद्यस्थितीत महायुतीकडे पाच आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे एक आमदार आहे. मात्र शिवसेना आमदार महायुतीत असले तरी मतदार कुणाकडे याचा फैसला झालेला नाही. शिवसेनेचे मतदार ठाकरेंसोबत येणार की शिंदेंसोबत याबाबत विजयाचे गणित ठरणार आहे.(Lok Sabha Election 2024)
तीन आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाडमधून स्नेहल जगताप, दापोलीमध्ये संजय कदम अशा युवा चेहऱ्यांना आपल्या पक्षात आणून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असा हा तोडीस तोड सामना या मतदार संघात पाहायला मिळणार आहे. सुनील तटकरेंच्या उमेदवारीसाठी आमदारांचा पुढाकार आहे. रायगडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याने सुनील तटकरे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या आदिती तटकक्षरे या महायुतीच्या उमेदवार असू शकतील. मात्र कोणीही रिंगणात उतरलं तरी तटकरे विरुद्ध गिते हाच सामना होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
या मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची ५० ते ६० हजार मते आहेत, मात्र भाजपने शेकापचे पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन शेकापचे व्होट बँक दुभंगण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. मात्र धैर्यशील पाटील हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपात गेले होते. आता लोकसभा तटकरेंना मिळणार असेल तर आपले राजकीय भवितव्य काय, याबाबतही धैर्यशील पाटील विचार करू शकतात. त्यामुळे पुढच्या राजकीय घडामोडीवर मतदारसंघातील जय-पराजयाचे गणित निश्चित होऊ शकते.
Latest Marathi News रायगडमध्ये तटकरेंविरुद्ध गिते लढत Brought to You By : Bharat Live News Media.