Fire Accident : लेबर कॅम्पला भीषण आग; जीवितहानी नाही
पुणे/बाणेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सूसगाव येथील रचना डेव्हलपर्सच्या लेबर कॅम्पला शुक्रवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. यात सुमारे 29 गॅस सिलिंडर क्षतिग्रस्त झाले. त्यातील तीन फुटले, तर इतर 26 सिलिंडरमधील गॅस जळून तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या पत्र्याचे घरांचे मोठे नुकसान झाले. आग इतकी भयानक होती, की ती विझविण्यासाठी सुमारे दोन तास अग्निशमन दलाचे जवान झटत होते. पत्र्याच्या लेबर कॅम्पमधील 50 पैकी 20 खोल्या जळून भस्मसात झाल्या. त्यामुळे कामगारांच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.
कपाटात ठेवलेले पैसे व दागिने जळून त्याची राख झाली. सर्व कामगार सकाळीच कामाला गेल्याने सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या सात गाड्या, दोन वॉटर बाउजर व टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर कामगारांनी जळालेल्या नोटा आणि सोन्याचे दागिने शोधण्यासाठी प्रचंड धडपड केली. आगीमुळे लोखंडी कपाटे तप्त झाली होती. तरीही कामगार आपल्या चीजवस्तू काढण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते. हात भाजण्याचा विचारही त्यांनी केला नाही. पूजेचा दिवा कलंडल्याने आग लागली असावी, असे काही कामगारांनी सांगितले. पाषाण अग्निशमन केंद्राचे शिवाजी मेमाणे, कमलेश सनगाळे, गजानन पाथरुडकर, फायरमन जवान शशिकांत धनवटे, गजानन बालघरे, चंद्रकांत बुरुड, देविदास चौधरी, सोपान बहिरम, महेश चिरगुटे, स्वप्निल वाघमारे, वाहनचालक रमेश रणदिवे आदी जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
अग्निशमन दलाची गाडी येण्यास विलंब
बाणेर आणि सूस परिसरात अग्निशमन दलाचे केंद्र सुरू करावे. औंध व पाषाण परिसरातून अग्निशमन दलाची गाडी येण्यास विलंब होतो. बाणेर येथे अग्निशमन दलाचे केंद्र उभारण्यात आले आहे. ते लगेच सुरू करावे तसेच सूस परिसरात एखादे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी या वेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली.
या आगीत वीस घरे जळाली. तात्पुरत्या स्वरूपात कामगारांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– प्रफुल्ल श्रीगिरीवार, प्रकल्प व्यवस्थापक, रचना लाइफस्टाईल.
हेही वाचा
Lalit Patil Drug Case : ललित पाटीलसह चौदा जणांवर दोषारोपपत्र
महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का
Cyber Crime : शेअर मार्केटच्या नादात पावणेतीन कोटींवर पाणी
Latest Marathi News Fire Accident : लेबर कॅम्पला भीषण आग; जीवितहानी नाही Brought to You By : Bharat Live News Media.