मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राहुल गांधी यांची तोफ धडाडणार
ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा भिवंडीतील मुक्काम हा महाविकास आघाडीला नवसंजीवनी देणारा ठरला असून शनिवारी (दि.१६) ही कौसा, मुंब्रा, कळवामार्गे ठाण्यात येणार आहेत. राहुल गांधी हे पहिल्यादाच ठाण्यात येत असून ते शिवसेना जिल्हाप्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभीनाक्यावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात गांधी यांची तोफ धडाडणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मुंब्रा- कळवा आणि ठाणे सज्ज झाले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील आनंद दिघे चौकात सभा घेतल्यावर मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे भिवंडीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या (दि.१६) सकाळी भारत जोडो न्याय यात्रा ही रेतीबंदर मार्गे कौसा येथे येईल आणि तेथून पायी यात्रेला सुरुवात होईल. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांनी जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण मुंब्रा, कळवा होल्डिंग, बॅनरने सजले आहे. तसेच जागोजागी राहुल गांधी यांचे तुतारी वाजवून स्वागत केले जाणार आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांची यात्रा कळवा पुलावरून ठाण्यात येईल.
ही यात्रा शिवसेना जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमासमोरून जाईल. त्यावेळी दिघे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून गांधी हे दिघे यांना आदरांजली वाहतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेना खासदार राजन विचारे आणि दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील. तलावपाळी येथे खुल्या जीपमधून उपस्थितांचे स्वागत स्वीकारून राहुल गांधी हे विचार व्यक्त करतील. त्यानंतर पुढे यात्रा मुलुंडमार्ग मुंबईला जाईल.
ठाण्यात राहुल गांधी येत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेनेत उठाव करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु आनंद दिघे यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले. शिवसेनेचे मुख्यालय देखील दिघे यांच्या मठात सुरु करण्यात आले आहे. अशा वेळी यात्रेच्या निमित्ताने दिघे यांचे दुसरे शिष्य खासदार राजन विचारे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पहिल्यांदा धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला नमन करण्यासाठी घेऊन जातील.
हेही वाचा :
Arvind Kejriwal: केजरीवालांना सत्र न्यायालयाचा दणका; ईडी समन्सला स्थगिती देण्यास नकार
शिवसेनेचे आमदार परत जाणारच नाहीत : बावनकुळे यांचा दावा
मोठी बातमी | रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार नाही, एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं…
Latest Marathi News मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात राहुल गांधी यांची तोफ धडाडणार Brought to You By : Bharat Live News Media.