नक्षल्यांकडून ३० नोव्हेंबरला गडचिरोली बंदचे आवाहन; तोडगट्टाचे आंदोलन बंद पाडल्याचा निषेध
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड व दमकोंडावाही येथील लोहखाणींच्या विरोधात मागील आठ महिन्यांपासून तोडगट्टा येथे आदिवासींनी सुरु केलेले ठिय्या आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन बंद पाडल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी ३० नोव्हेबरला गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.
माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा पश्चिम उपविभागीय प्रवक्ता श्रीनिवास याने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन पोलिसांनी तोडगट्टा येथील आंदोलन दडपशाहीच्या जोरावर मोडीत काढल्याचे म्हटले आहे. मागील २५५ दिवसांपासून शेकडो आदिवासी सुरजागड व दमकोंडावाही येथील लोहखाणींचा विरोध करण्यासाठी तोडगट्टा येथे शांततेत आंदोलन करीत होते. परंतु २० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा पोलिस आणि सी-६० पथकाच्या जवानांनी भल्या पहाटे आंदोलनस्थळी वेढा घातला आणि मंचाची मोडतोड करुन झोपड्याही उदध्वस्त केल्या, असे श्रीनिवासने म्हटले आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्ष या घटनेचा निषेध करीत असून अटक केलेलय आदिवासींची तत्काळ सुटका करावी, अशी मागणीही श्रीनिवासने केली आहे. आंदोलकांनी स्वत:च आपले आंदोलन संपविल्याचे पोलिसांचे म्हणणे पूर्णत: खोटे असल्याचे श्रीनिवासने म्हटले आहे.
क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय गौरव दिनानिमित्त संबोधित करताना देशातील ७५ मूळ निवासी आदिवासी समुहांचा उल्लेख ‘विकसित’ असा केला, ही अत्यंत खेदाची बाब आहे. एकीकडे आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये विकसित भारत यात्रा काढली जात आहे, तर दुसरीकडे आदिवासींनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरु केलेले जनआंदोलन दडपले जात आहे. विकसित भारत यात्रेचा खरा हेतू आदिवासींचे अस्तित्व पुसून कार्पोरेट घराण्यांचा विकास करणे हा आहे, असा आरोप नक्षल प्रवक्ता श्रीनिवासने केला आहे.
विविध लोहखाणींच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने नष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करीत असून, वांगेतुरी येथील पोलिस ठाणे तत्काळ हटवावे, अटक केलेल्या तोडगट्टा येथील आंदोलकांची सुटका करावी या मागण्यांसाठी ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदचे आवाहन श्रीनिवासने केले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी आधीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन तोडगट्टा येथील आंदोलन आदिवासींनी स्वत:च मागे घेतल्याचे म्हटले आहे. शिवाय स्थानिक आदिवासींना विकास हवा असून, नक्षलवादी जबरदस्तीने आंदोलन करावयास भाग पाडत असल्याचेही पोलिसांनी महटले आहे.
The post नक्षल्यांकडून ३० नोव्हेंबरला गडचिरोली बंदचे आवाहन; तोडगट्टाचे आंदोलन बंद पाडल्याचा निषेध appeared first on पुढारी.
गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड व दमकोंडावाही येथील लोहखाणींच्या विरोधात मागील आठ महिन्यांपासून तोडगट्टा येथे आदिवासींनी सुरु केलेले ठिय्या आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करुन बंद पाडल्याच्या निषेधार्थ नक्षल्यांनी ३० नोव्हेबरला गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा पश्चिम उपविभागीय प्रवक्ता श्रीनिवास याने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन पोलिसांनी तोडगट्टा येथील आंदोलन दडपशाहीच्या …
The post नक्षल्यांकडून ३० नोव्हेंबरला गडचिरोली बंदचे आवाहन; तोडगट्टाचे आंदोलन बंद पाडल्याचा निषेध appeared first on पुढारी.