नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली विविध विभागांची बैठक

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१२) बैठक बोलविली आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये विविध विभागांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आपत्ती निवारणाच्या कामांसाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असताना लोकप्रतिनिधींनी यापूर्वी ७८९ कोटींची कामे प्रस्तावित केल्याने आराखडा चर्चेत आला होता.
देशभरातील जिल्ह्यांत नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा धोका लक्षात घेत केंद्र व राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांकडून आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार १०० कोटी रुपयांच्या मर्यादेत शासनाने कामांची यादी मागविली होती. परंतु, जिल्ह्यात १५ आमदारांनी विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून किमान २०० ते २५० कामे प्रस्तावित केली. परिणामी आराखड्यातील कामांची किंमत थेट ७८९ कोटींवर पोहोचली. एकाच जिल्ह्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देणे शक्य नसल्याचे सांगत शासनाने हा अहवाल पुन्हा प्रशासनाकडे पाठविला. तसेच शंभर कोटींच्या मर्यादेत कामे सुचविण्याच्या सूचना केल्या.
शासन सूचनेनूसार प्रशासनाने प्राधान्यक्रमानुसार कामांचा आराखडा तयार केला. या आराखड्यात उष्माघाताने होणाऱ्या मृत्यूसह आरोग्यविषयक बाबींवरील कामे प्राधान्याने घेण्यात आली आहे. सदर आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतखालील बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात एखादी आपत्ती ओढावल्यास त्यामुळे होणारी हानी कमीत-कमी ठेवणे शक्य होणार आहे.
आराखड्यातील प्राधान्याची कामे
आराखड्यात विविध कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये धरण क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे व वीजप्रतिबंधक यंत्रणा उभारण्यात येईल. सदरची कामे ही गौतमी-गोदावरी, कश्यपी, गंगापूर, दारण, कडवा, मुकणे आदी धरण क्षेत्रात केली जातील. तसेच भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामांचा समावेश आराखड्यात आहे. या कामांसाठी तीन कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून सिन्नरमधील सरस्वती नदीच्या दोन्ही तिरांवर भींत उभारण्यासाठीच्या ४५ कोटींच्या कामाच समावेश आहे.
Latest Marathi News नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलविली विविध विभागांची बैठक Brought to You By : Bharat Live News Media.
