दोन्ही पवारांची ‘राजकीय मर्यादा’ पहिल्यांदाच अधोरेखित!

कोल्हापूर : सुनील कदम : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवारांसह एकूणच पवार कुटुंबीयांची खरी राजकीय पॉवर अधोरेखित होताना दिसत आहे. राज्यातील भाजप, काँग्रेस, ठाकरे सेना, शिंदे सेना इतकेच काय, पण वंचित बहुजन आघाडीपेक्षाही पवारांची राजकीय ताकद क्षीण झाल्याचे दिसत असून, दोन्ही पवारांनीही ते जवळ जवळ मान्य केल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे … The post दोन्ही पवारांची ‘राजकीय मर्यादा’ पहिल्यांदाच अधोरेखित! appeared first on पुढारी.

दोन्ही पवारांची ‘राजकीय मर्यादा’ पहिल्यांदाच अधोरेखित!

कोल्हापूर : सुनील कदम : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवारांसह एकूणच पवार कुटुंबीयांची खरी राजकीय पॉवर अधोरेखित होताना दिसत आहे. राज्यातील भाजप, काँग्रेस, ठाकरे सेना, शिंदे सेना इतकेच काय, पण वंचित बहुजन आघाडीपेक्षाही पवारांची राजकीय ताकद क्षीण झाल्याचे दिसत असून, दोन्ही पवारांनीही ते जवळ जवळ मान्य केल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे राजकारण मागील जवळपास पन्नास वर्षांपासून आपल्या राजकीय वलयाभोवती फिरवत ठेेवण्यात शरद पवार यशस्वी झाले आहेत. पण, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता केवळ शरद पवार यांची स्वत:ची अशी खरी राजकीय पॉवर किती, हा प्रश्न नेहमीच गुलदस्त्यात राहिलेला आहे. पूर्वी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे नेतेसुद्धा राष्ट्रवादीला राष्ट्रवादी नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रवादी म्हणून हिणवत होते. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीची किंबहुना शरद पवार यांची बहुतांश राजकीय ताकद ही पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातही पुन्हा साखर पट्ट्यातच एकवटलेली होती. पण, राष्ट्रवादीचे नेते हे कधीही मान्य करीत नव्हते आणि राज्याच्या बहुतांश भागात आपल्याकडे निर्णायक ताकद असल्याचे ठासून सांगत आले आणि त्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात आपणाला हवे असलेले दान पदरात पाडून घेत होते. शिवाय याच माध्यमातून देशाच्या राजकारणातही शरद पवार यांचे स्थान नेहमीच निर्णायक किंवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होत होता.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून म्हणजेच 1999 पासून राज्यात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा आढावा घेता, असे लक्षात येते की विरोधक पश्चिम महाराष्ट्रवादी म्हणून करीत असलेली राष्ट्रवादीची हेटाळणी अगदीच निरर्थक नसायची. कारण, या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार आणि खासदार याच भागातून निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे 2004 च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 50 आकड्याच्या आत-बाहेरच असल्याचे दिसते. राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील खासदारांची संख्याही कधी दुहेरी आकडा गाठू शकलेली नाही. तरीदेखील शरद पवार – अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणातील आपले महत्त्व कमी न होऊ देण्याची दक्षता घेतली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही खरीखुरी राजकीय ताकद दृगोचर होताना दिसत आहे.
एकीकडे भाजप महायुतीच्या माध्यमातून राज्यातील 32 ते 36 जागा लढविण्याची तयारी करीत आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेली काँग्रेसही 20 ते 22 जागा लढविण्यासाठी आग्रही आहे. ठाकरे सेनाही 18 ते 20 जागांसाठी मागणी रेटत आहे. शिंदे सेनेचे खासदारही आपल्या 12 जागा सोडायला तयार नाहीत. इतकेच काय पण वंचित बहुजन आघाडीनेही 12 ते 18 जागांचा आग्रह धरून प्रसंगी आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. असे असताना महाराष्ट्राचे राजकारण आपल्या भोवती फिरत असल्याचा दावा करणार्‍या शरद पवारांनी 9 जागांवर, तर अजित पवारांनी केवळ 3 ते 4 जागांवर समाधान मानण्याची मानसिक तयारी केलेली दिसत आहे. याचाच अर्थ या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पवारांना आणि महाराष्ट्रातील जनतेलाही दोन्ही पवारांच्या खर्‍या राजकीय ताकदीची पहिल्यांदाच पोहोचपावती मिळाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शरद पवार
महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाट्याला फार फार तर नऊ जागा येतील, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यापैकी बहुतांश जागा शरद पवारांच्या नेहमीच्या प्रभाव क्षेत्रातीलच असतील, असे दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी एकसंध असतानासुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्वाधिक जागा या केवळ 9 आहेत. शरद पवारांची खरी राजकीय ताकद तेवढीच असल्याचे जणूकाही मान्य करूनच महाविकास आघाडीत जागावाटप झाल्याचे त्यातून जाणवत आहे.
अजित पवार
अजित पवारांची अवस्था तर जास्तच केविलवाणी झाली आहे. महायुतीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इनमीन तीन आणि फार फार झाल्या तर केवळ चार जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. अजित पवार गटानेही मिळतील तेवढ्या जागा निमूटपणे पदरात पाडून घेऊन समाधान मानण्याचे धोरण स्वीकारलेले दिसत आहे. बारामती-पुणे आणि रायगडच्या पलीकडे अजित पवारांचे राजकीय अस्तित्व मान्य करायलाच भाजपचे नेते राजी नाहीत.
हेही वाचा : 

लोकसभा निवडणूक : कोल्हापूरसाठी रस्सीखेच; भाजपची आग्रही मागणी
इंडिया आघाडीतील बेकी
फडणवीसांनी सांगितला ‘लाल फिती’च्या कारभाराचा अनुभव

Latest Marathi News दोन्ही पवारांची ‘राजकीय मर्यादा’ पहिल्यांदाच अधोरेखित! Brought to You By : Bharat Live News Media.