भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरचा फड

उदगीर, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने अपेक्षेप्रमाणे आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजविला. याचबरोबर संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील … The post भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरचा फड appeared first on पुढारी.

भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरचा फड

उदगीर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने अपेक्षेप्रमाणे आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजविला. याचबरोबर संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. श्रीगोंद्याच्या (जि. नगर) भाग्यश्री फंड हिने 62 किलो गटातील अंतिम लढतीत सांगलीच्या पूजा लोंढेला पहिल्या फेरीतच लोळविले. लढतीला सुरुवात होताच भाग्यश्रीने एकेरी पटात घुसून पूजाच्या पाठीवर स्वार होत 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर भाग्यश्रीच्या मगरमिठीतून पूजाला स्वत:ची सुटका करून घेता आली नाही. मग भारंदाज डावावर सलग 8 गुणांची कमाई करीत भाग्यश्रीने पहिल्या फेरीतच पूजाचा खेळ खल्लास करीत सुवर्णपदक जिंकले. सातार्‍याच्या सिद्धी कणसेने कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या 72 किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या संजना बागडी हिने लातूरच्या आराधना नाईकचा 10-0 फरकाने फडशा पाडला. सातार्‍याची प्रीती पाटील व नगरची सोनिया सरक यांना कांस्यपदके मिळाली. 57 किलो गटात सातार्‍याची आश्लेषा बागडे व लातूरची अंकिता जाधव यांच्यात तोडीस तोड लढत झाली. लढत 2-2 अशी बरोबरीत असताना आश्लेषाने चितपट कुस्ती मारून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 53 किलो गटातील अंतिम लढतीत कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कोल्हापूरच्याच तृप्ती गुट्टा हिला 12-3 गुण फरकाने धूळ चारत सुवर्णपदकाची कमाई केली.
श्रीकांत, सूरज, पार्थ, ओंकार, राकेश, सतीशला सुवर्णपदके
स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुरुष विभागात कोल्हापूरचा सूरज अस्वले व नाशिक जिल्ह्याचा पवन डोन्नर यांच्यातील 61 किलो गटातील अंतिम लढत अतिशय लक्ष्यवेधी ठरली. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार्‍या या कुस्तीत अखेर सूरजने 12-7 गुण फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. 60 किलो गटात कोल्हापूरच्या श्रीकांत कामण्णने अंतिम लढतीत सोलापूरच्या आकाश सरगरचा 7-4 गुण फरकाने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. नाशिक जिल्ह्याचा अतुल मेदडे व कोल्हापूरचा प्रतीक पाटील कांस्यपदकाचे मानकरी ठरले.
67 किलो गटात पुणे शहरच्या पार्थ कंधारेने जळगावच्या अरबाज पठाणचा 8-0 गुण फरकाने धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकाविले. पुणे जिल्ह्याचा वैष्णव आडकर व कोल्हापूरचा माऊली टिपुगडे यांनी कांस्यपदके जिंकले. 72 किलो गटात कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने अंतिम लढतीत सोलापूरच्या किरण सत्रेचा 9-0 फरकाने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. 74 किलो गटात कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने कोल्हापूरच्याच अभिजित भोसलेचा 2-1 असा पराभव करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. 97 किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या सतीश मुंढेने कोल्हापूरच्या रोहन रंडेचे आव्हान 9-5 फरकाने मोडून काढले.
Latest Marathi News भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरचा फड Brought to You By : Bharat Live News Media.