पित्याच्या मृत्यूनंतर मनावर दगड ठेवून मुलाने दिला दहावीचा पेपर
उदगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : पहाटे वडिलांना कोल्हापुरात मृत्यूने गाठले… थोड्या वेळाने मृतदेह उदगावात घरी आणण्यात आला… सगळे वातावरण शोकाकुल बनले… आई, बहीण, भावंडे आणि नातेवाईक यांच्यासह त्याच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या… पण दहावीची परीक्षा सुरू असल्याने मुलाने मनावर दगड ठेवून आणि विद्यार्थ्याचे कर्तव्य बजावत दहावीचा पेपर दिला. परीक्षेच्या या तीन तासांमध्ये त्याच्या जीवाची किती घालमेल झाली असेल हे त्याचे त्यालाच ठाऊक. यासर फारूख मोळे असे या धैर्यवान मुलाचे नाव.
पहाडासारखे दु:ख बाजूला ठेवून जेमतेम 15 वर्षाच्या यासरने परीक्षा केंद्र गाठले. घरी वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, घरासह सगळे गाव शोकाकुल असताना त्याने दु:ख पाठीवर टाकून पेपर दिला आणि मग अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला. उदगाव (ता. शिरोळ) येथे सोमवारी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वडिलाच्या मृत्यूमुळे सर्वजण कुटुंबीय, नातेवाईक दुःखात होते. पेपर न दिल्यामुळे मुलाचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी नातेवाईकांनी त्याला धीर दिला.त्यानंतर त्याने दुःख पचवत हुंदके देत दहावीच्या परीक्षेचा पेपर दिला.
फारूख निजाम मोळे (वय 42) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. उदगाव येथून फारूख मोळे व त्याचे कुटुंबीय हे रविवारी सायकांळी पाचगाव-कोल्हापूर येथे बहिणीकडे गेले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराने फारूख मोळे यांचे पाचगावात निधन झाले. त्यांचा मृतदेह उदगाव येथे सकाळच्या सुमारास आणण्यात आला. मुलगा यासर याचा दहावीचा पेपर होता. आता तो पेपरला कसा जाणार अशी चिंता काही जाणत्या नातेवाईकांना वाटू लागली. कुटुंबीय, नातेवाईकांनीही त्याला धीर दिला. वडिलांच्या निधनाचे दु:ख मनात ठेवत अश्रू गाळत यासर याने पेपर लिहिला. तो पेपर देऊन आल्यानंतर सर्व विधी करण्यात आले.
यासर हा लक्ष्मीबाई पाटील हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने मालू हायस्कूल येथे परीक्षा दिली. फारूख यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Latest Marathi News पित्याच्या मृत्यूनंतर मनावर दगड ठेवून मुलाने दिला दहावीचा पेपर Brought to You By : Bharat Live News Media.