नव्या शिक्षक भरतीमुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचवेल : मंत्री महाजन
जळगाव : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करण्यात आली असून या माध्यमातून जळगाव जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देताना मनस्वी आनंद होत असून उपलब्ध झालेल्या शिक्षकांच्या माध्यमातून भविष्यकाळात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करण्यास नक्कीच मदत होणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात देखील जळगाव जिल्हा शिक्षण विभागाने मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त केले असून जळगाव जिल्हा शिक्षण विभागाची ही प्रगती निश्चितच आशादायी असल्यामुळे जळगाव जिल्हा या पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीत उंच भरारी घेईल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी रविवार दिनांक 10 मार्च रोजी संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात केले.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक महाभरती अंतर्गत निवड करण्यात आलेल्या नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप व ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पात्र ठरलेल्या शाळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 10 मार्च रोजी जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, दिलीप खोडपे, माजी अभियंता जेके चव्हाण, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे तसेच जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नामदार गिरीश महाजन म्हणाले की, निपुण भारत कार्यक्रमांतर्गत घेणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र पालटत आहे. या पुढच्या काळात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी जळगाव जिल्हा परिषद तसेच राज्य शासन करीत असून जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हास्तरावर दोन गटातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांना धनादेश स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात स्थानिक स्वराज्य संस्था गटात जिल्हा परिषद शाळा भोटा तालुका मुक्ताईनगर प्रथम पुरस्कार तर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक वर आलेल्या जिल्हा परिषद शाळा जलोद व पिंगळवाडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तर इतर व्यवस्थापनाच्या खाजगी शाळा गटातून प्रथम क्रमांक लडकू बाई विद्यालय भडगाव, तर द्वितीय क्रमांक एस एस पाटील विद्यालय शहर्डी तालुका चोपडा तर तृतीय क्रमांक पी एल नेमाडे प्राथमिक विद्यालय सावदा या शाळांना देखील यावेळी धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विभाग वार विशेष कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा मुखेड तालुका चाळीसगाव व पिके शिंदे विद्यालय पाचोरा या शाळांना देखील गौरविण्यात आले. यावेळी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक महाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
हेही वाचा :
मोठी बातमी : ‘भोजशाळा’ संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणास उच्च न्यायालयाची परवानगी
Rahul Kaswan joins Congress : राजस्थानातील भाजप खासदार राहुल कासवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Latest Marathi News नव्या शिक्षक भरतीमुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता उंचवेल : मंत्री महाजन Brought to You By : Bharat Live News Media.