वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभस्म सक्षम
पॅरिस : वाढत्या वयाची लक्षणे, त्यामुळे येणार्या सुरकुत्या आणि त्याचे विपरीत परिणाम टाळण्यासाठी सुवर्णभस्म अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाच्या एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदातील औषधे आणि सौंदर्य प्रसाधनात सुवर्णभस्माच्या वापराचा उल्लेख आढळून येतो. मात्र, आता युरोपमध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या माध्यमातूनही याला दुजोरा मिळाला आहे.
सुवर्णभस्माचे नॅनो कण त्वचेला बाहेरील संक्रमणापासून तर रोखतातच; शिवाय, ते वाढत्या वयाचे परिणाम रोखण्यासाठी देखील तितकेच सक्षम असतात, असे या संशोधन पथकाने म्हटले आहे. आयुर्वेदात याला सुवर्णभस्म या नावाने ओळखले जाते.
‘एल्सवियर’ या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित या शोधनिबंधानुसार, सूर्याची अल्ट्रा व्हायलेट किरणे, प्रदूषण, सिगारेटचा धूर यामुळे चेहर्यावरील नरम त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचते. कारण, या सर्व घटकांचा चेहर्यावर थेट परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी होते. सूज येऊ लागते. संक्रमण लवकर होत राहते. पण, सुवर्ण नॅनो कणांमुळे ही शक्यता बरीच कमी होते.
एरवी वय वाढत असताना पेशी देखील कमकुवत होऊ लागतात. मात्र, सुवर्ण नॅनो कणांचा वापर कोणत्याही माध्यमातून होत असल्यास पेशी कमकुवत होण्याची ही प्रक्रिया बरीच मंदावते आणि तसेच नव्या पेशी वेगाने तयार होऊ लागतात. याशिवाय, सुवर्ण नॅनो कणांचा त्वचेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.
सुवर्ण नॅनो कणांच्या सौंदर्य उत्पादनामुळे एपिडर्मल व फायब—ोब्लास्ट पेशींना मजबुती मिळते, यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, त्वचा नरम राहते. पूर्ण पोषण मिळत असल्याने पेशी पुन्हा मजबूत होऊ लागतात आणि कोलेजन प्रोटिनची प्रक्रियाही जलद होते, असे संशोधकांनी या अभ्यासात पुढे नमूद केले आहे.
Latest Marathi News वाढत्या वयाचा परिणाम रोखण्यासाठी सुवर्णभस्म सक्षम Brought to You By : Bharat Live News Media.