कोल्हापूर, हातकणंगलेबाबत ‘मविआ’त मतभेद
पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीतील जागावाटप करताना तीनही पक्षांचे वेगवेगळे म्हणणे आहे. त्यावर एकमत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितल्याने अजूनही या जागांवर मतभेद असल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
कोल्हापुरातील जागेवर कोण उभे राहणार हे निश्चित झाल्यावर बरेचसे गणित सुटेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी
व्यक्त केला. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाबद्दल विचारले असता ते बोलत होते. ते म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद भक्कम आहे. आमच्यासह शिवसेना एकत्रित आली तर ती जागा निवडून येऊ शकते.
आ. पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे. फक्त वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर यावी, असे महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे एकत्रित प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. त्यांच्याशी अंतिम चर्चा केल्याशिवाय लोकसभेच्या उमेदवारांचे जागावाटप जाहीर करणार नसल्याची माहितीही दिली.
संयुक्त बैठकीला प्रकाश आंबेडकर हे आम्ही दिलेला प्रस्ताव त्यांच्या कार्यकारिणीपुढे ठेवणार आहेत. त्यांच्याकडून एक पत्र आलेले असून त्यावर एकत्रित विचार करून त्यांच्याशी बोलणी करू. ते महाविकास आघाडीसोबत येतील, याची आम्हाला खात्री आहे.
राज ठाकरे यांना टोला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार एकच असल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, देश आणि महाराष्ट्रात शरद पवार यांनी गेली 50-55 वर्षे राजकारण केले. त्यात उत्कृष्ट काम करणार्या लोकांना त्यांनी नेहमीच जवळ केले. हे लोक जनतेच्या मनातील असल्याने ती निवडून येत गेली. त्यामुळे निवडून येणार्यांची मोळी प्रत्येक पक्षात असते. त्यामुळे ती मोळी ज्यांना बांधायला आली नाही, त्यांच्या विधानाबद्दल मी बोलणे उचित नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Latest Marathi News कोल्हापूर, हातकणंगलेबाबत ‘मविआ’त मतभेद Brought to You By : Bharat Live News Media.