विरोधक संपविण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर
पलूस, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपकडून सत्तेचा उपयोग विरोधक संपवण्यासाठी करण्यात येत आहे, अशी खरमरीत टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार सचिन पायलट यांनी केली.
कृष्णा नदीवरील बुर्ली – सूर्यगाव या पुलाच्या बांधकामाच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पायलट म्हणाले, देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभेची तयारी झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मुंबईमध्ये सांगता होत आहे. यामध्ये इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्ष उपस्थित राहणार आहेत. भाजप सरकारने केलेल्या दहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा बघूनच जनता मतदान करणार आहे. वातावरण बघून मतदार मतदान करत नसतात. देशात शेतकर्यांसाठी, तरुणांसाठी भाजपने काय काम केले आहे, हे पाहूनच मतदान होणार आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज आहे.
सध्या विरोधक पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यात मग्न आहेत. महापुराच्या काळात विश्वजित यांनी जिवाची पर्वा न करता काम केले. महापुराचा बुर्ली गावातील लोकांना त्रास होऊ नये यासाठी पुलाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
महेंद्र लाड म्हणाले, आमदार डॉ. कदम यांनी पूल बांधकामासाठी 22 कोटी 80 लाख, भूसंपादनासाठी 1 कोटी 28 लाख, जोडरस्ते सुधारण्यासाठी 5 कोटी शासनाकडून तातडीने मंजूर करून घेतले आहेत. हा पूल झाल्यानंतर बुर्ली-सूर्यगावबरोबरच नदीकाठावरील नागरिकांना महापुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे. डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाहीत. विशाल पाटील कुठल्याही परिस्थितीत खासदार होणारच आहेत.
यावेळी बुर्लीच्या सरपंच दीपाली काळे, उपसरपंच उमेश पाटील, पलूस नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, सुखवाडीचे सरपंच बाळासाहेब यादव, खटावचे सरपंच ओंकार पाटील, सांडगेवाडीचे सरपंच अमर वडार, माजी नगराध्यक्ष परशुराम मोरे, वर्षांत माळी, पलूस बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे, मारुती चव्हाण, नागठाणेचे सरपंच विजय माने, गंगाराम सूर्यवंशी, विजय आरबुने, अरुण सावंत, सचिन सुतार, माजी सरपंच संतोष पाटील, अनिल विभुते, सर्जेराव पवार, माजी सरपंच प्रशांत नलावडे, प्रियांका सावंत, उत्तमराव पवार उपस्थित होते.
Latest Marathi News विरोधक संपविण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर Brought to You By : Bharat Live News Media.