संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरद़ृष्टी
प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
छत्रपती संभाजी महाराज हे एक आदर्श कल्याणकारी राजे होते. ‘मध्ययुगीन इतिहासातील कर्तृत्ववान महापुरुष,’ असे शिवाजी महाराजांचे यदुनाथ सरकार यांनी वर्णन केले होते. असाच कर्तृत्वाचा ठसा संभाजी महाराजांनीसुद्धा प्रशासकीय कार्यपद्धतीने उमटवला. संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे साक्षेपी आकलन डॉ. कमल गोखले यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या ग्रंथामध्ये केलेले आहे. आज संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने
संभाजीराजांचा जीवनकाळ हा 14 मे, 1657 ते 11 मार्च, 1689 असा होता. यापैकी 1680 ते 1689 हा 10 वर्षांचा काळ त्यांना राज्यकारभारासाठी मिळालेले दशक होते; परंतु या दशकामध्ये दूरद़ृष्टीने छत्रपती संभाजीराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या लोकप्रशासनावर विलक्षण छाप उमटवली. त्यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण जसे काळाच्या पुढे होते, तसेच त्यांचे लोकप्रशासनही कल्याणकारी राज्याचा एक आदर्श नमुना होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेमध्ये ‘मुद्रा भद्राय राजते’ ही संकल्पना मांडली होती. ही संकल्पना 1646 मध्ये स्वराज्याचे तोरण बांधले तेव्हापासून व्यवहारात होती. शिवाजी महाराजांचे राज्य हे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे आणि विश्ववंद्य आहे आणि ते जनतेच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे, असे या मुद्रेमध्ये म्हटले होते.
संभाजी महाराजांनीही हेच लोककल्याणाचे सूत्र आपल्या प्रशासनामध्ये कायम ठेवले. संभाजीराजांनी प्रारंभिक जीवनामध्ये घेतलेले शिक्षण हे परिपूर्ण असे होते. विशेषतः विविध भाषांवर असणारे त्यांचे प्रभुत्व हे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देणारे होते. त्यांनी भारतीय भाषांबरोबरच परकीय भाषांमध्येही प्रावीण्य संपादित केले. संस्कृतमध्ये तर ते प्रगाढ बुद्धीचे संशोधक होते. शिवाय त्यांना ग्रीक, लॅटिन आदी भाषाही ज्ञात होत्या. संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या 14 वर्षी ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी ‘नायिकाभेद’, नखशिख’ आणि ‘सातसतक’ हे ग्रंथही लिहिले.
प्रशासनाच्या 10 वर्षांच्या काळात त्यांनी मुघलांशी केलेला संघर्ष, पोर्तुगीजांवर मिळवलेला विजय, इंग्रजांशी केलेला द़ृढतर संघर्ष आणि समुद्रकिनारी असलेल्या वसईतील लोकांशी केलेला संघर्ष विलक्षण ठरला. मुघलांशी केलेल्या संघर्षाचा इतिहास पाहिल्यास संभाजीराजेंची प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याची पद्धती किती आक्रमक होती, हे लक्षात येते. पोर्तुगीज दस्तावेजांमध्ये त्यांचे वर्णन ‘युद्धप्रिय राजपुत्र’ असे केले आहे. त्यांच्या लष्करी मोहिमांमध्ये रामशेजचा वेढा असो किंवा तळकोकणातील मुघल आक्रमकांशी त्यांनी 1684 मध्ये दिलेली झुंज असो, जंजिर्याच्या सिद्धीबरोबरचा संघर्ष असो किंवा गोव्यातील पोर्तुगीजांना नामोहरम करून वास्को बंदरावर मिळवलेला विजय असो, त्यावरून स्वराज्याच्या रक्षणासाठीचा त्यांचा झुंझार बाणा लक्षात येतो. म्हैसूरचा विजयही त्यांच्या शौर्याचा एक रोमहर्षक पैलू होता.
संभाजी महाराजांचे लोकप्रशासन हे शिवकाळातील श्रेष्ठ परंपरांना सुवर्णबैठक प्राप्त करून देणारे होते. शंभूराजांनी शिवरायांनी निर्माण केलेल्या लोकाभिमुख राज्यपद्धतीचा वारसा सांभाळला आणि पुढे जाऊन अधिक समृद्ध केला. त्यांनी वडिलांच्या बहुतेक सर्व प्रगतिशील धोरणांचा पाठपुरावा केला आणि त्यांची तत्त्वे व विचार दोन्हीही कृतीमध्ये आणले.
संभाजी महाराजांच्या राजवटीमध्ये 1684 ते 1688 या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी महाराजांनी केलेल्या उपाययोजना महत्त्वपूर्ण होत्या. दुष्काळ निवारणासाठी त्यांनी एक त्रिसूत्री अवलंबली होती. पहिले म्हणजे गरीब शेतकर्यांना तत्काळ मदत करून त्यांनी शिवाजी महाराजांची शेतकर्यांना अनुकूल अशी धोरणे पुढे चालू ठेवली. शेतसारा माफ करणे, कमी करणे व योग्य वेळी शेतकर्यांना आर्थिक आणि अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करणे हेसुद्धा उपाय केले. दुसरे म्हणजे संभाजी महाराजांनी अनेक ठिकाणी नद्यांवर बांध आणि छोटी धरणे बांधली. या माध्यमातून पाणी अडवून स्वराज्यातील शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसते.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात संभाजी महाराजांनी बांधलेले मध्यम सिंचन प्रकल्पाचे उदाहरण द़ृष्टिपथात आहे. संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये पाच हजार किलोमीटरची भर घातली. त्यांनी दक्षिणेवर दोनदा स्वारी करून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिर्याजवळ आठशे मीटर लांबीचा पूल बांधला. जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माण करण्याचे श्रेय संभाजीराजांना जाते. याखेरीज स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखानाही शंभूराजांनी सुरू केला. म्हैसूरविरुद्धच्या लढाईत तेथील सैन्याने सोडलेल्या प्राणघातक बाणांपासून मावळ्यांच्या रक्षणासाठी सैनिकांना चामड्यापासून बनवलेले जॅकेट पुरवले होते. असे जॅकेट मजबूत आणि विषारी बाणांपासून संरक्षण देणारे होते. त्यामुळे जगातील पहिले ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ तयार करण्याचा मानही संभाजीराजांकडे जातो. एकूणातच लोकप्रशासनाच्या क्षेत्रात असो, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात असो किंवा रणांगणावर असो, रयतेच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी संभाजीराजे सदैव स्वराज्यरक्षकाच्या भूमिकेत अग्रेसर राहिले.
Latest Marathi News संभाजीराजेंची लोकप्रशासनातील दूरद़ृष्टी Brought to You By : Bharat Live News Media.