लोकसभा निवडणुकीची लगीनघाई!
मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता असून मंत्रालयात निर्णय घेण्याचा सपाटा सुरू आहे. सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक होणार असून त्यामध्ये विविध लोकप्रिय निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारला अनेक लोकप्रिय निर्णय घ्यायचे आहेत. याशिवाय आमदारांच्या मतदारसंघातील अनेक प्रलंबित निर्णय मार्गी लावायचे आहेत. यामुळे सोमवार व मंगळवारी सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीचे अनुभव पाहता निवडणुकीपूर्वी होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे या दोन दिवसांतही निर्णयांचा पाऊस पाडून राज्य सरकार राज्यातील जनतेला खूश करण्याचे प्रयत्न करेल. याशिवाय जे निर्णय घेतले, त्याचे आदेश काढण्यासाठीही मंत्रालयात धावपळ सुरू आहे. सध्या मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि मुख्यमंत्री कार्यालयात अभ्यागतांची गर्दी वाढली आहे. आचारसंहिता लागू झाली तर कामे रखडतील म्हणून सर्वचजण प्रयत्नशील आहेत.
मंत्र्यांनी आपल्याकडील फाईल्स क्लिअर करण्याचा सपाटा लावला आहे. या फाईल्सच्या माध्यमातून लोकांना खूश करतानाच त्यांनी निवडणुकीसाठी पक्षनिधी जमविण्यावर भर दिला असल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात आहे. पक्ष निधीच्या नावाने काही मंत्री स्वतःचेही चांगभले करत असल्याची कुजबुज आहे. अनेक मंत्र्यांनी वैयक्तिक लाभाच्या अनेक फाईल्स या महिनाभरात हातावेगळ्या केल्या आहेत.
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीची लगीनघाई! Brought to You By : Bharat Live News Media.