कोल्हापुरात होणार दिव्यांग भवन
कोल्हापूर; सतीश सरीकर : दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच दिव्यांग भवन (ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल पीपल) कोल्हापुरात साकारणार आहे. महापालिकेने एक कोटी 71 लाख स्वनिधीतून दिव्यांग बांधवांसाठी हा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला आहे. 12 हजार चौरस फूट जागेत अनोखे भवन उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.
कोल्हापुरात सुमारे 2700 दिव्यांग बांधव आहेत. महापालिकेच्या वतीने त्यांना विविध सुविधा देण्यात येत आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्याअंतर्गत 2023-24 या वर्षीच्या अर्थसंकल्पात 5 कोटी निधी दिला आहे. या निधीतून शहरातील बेलबाग, मंगळवार पेठत तीन मजली भव्य असे दिव्यांग भवन बांधले जाणार आहे. यात दिव्यांग बांधवांना ट्रीटमेंट, शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक अशा सर्व सुविधा असतील.
इमारतीचे बांधकाम एकूण 16 हजार चौरस फूट आहे. पहिल्या मजल्यावर आवाजाच्या सहाय्याने मेडिकल ट्रीटमेंट सेंटर, फिजिओथेरपी सेंटर, कल्चरल हॉल, व्हीलचेअर रिपेअर अँड सेल शॉप, कन्सल्टिंग रूम असेल. पहिल्या दुसर्या मजल्यावर इनडोअर गेम, जिम, कॉन्फरन्स हॉल, ब्रेन-स्क्रिप्ट वर्कशॉप, मेडिटेशन कौन्सिलिंग अँड लीगल सपोर्ट सेंटर तसेच तिसर्या मजल्यावर म्युझिक रूम, स्पीच थेरपी, सिम्युलेशन रूम, लाँज रूम आदी असेल.
दिव्यांग बांधवासाठी महापालिका दरवर्षी बजेटमध्ये 5 टक्के निधीची तरतूद करत आहे. दिव्यांग बांधवांची भवन बांधण्याची मागणी होती. त्यानुसार जागा, इमारतीचा प्लॅन मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल. दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील. दिव्यांग कक्षही त्या इमारतीत स्थलांतरित केला जाईल.
– रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी भवन बांधावे अशी मागणी आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासनाने लवकर प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करावे.
-देवदत्त माने, दिव्यांग बांधव
मनपातर्फे प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात दिव्यांगासाठी 5 टक्के तरतूद
तीन मजली दिव्यांग भवन
एकूण खर्च 1 कोटी 71 लाख
16 हजार चौरस फूट बांधकाम
कोल्हापुरात 2700 दिव्यांगांची नोंद
40 ते 70 टक्के दिव्यांगांना महिना 1 हजार रु. अनुदान
70 टक्केवर दिव्यांगांना महिना 1500 रु. अनुदान
कुष्ठरुग्ण बांधवांना महिना 1500 रु. अनुदान
दिव्यांग बांधवांना विवाहासाठी 21 हजार अनुदान
मृत दिव्यांग बांधवांच्या कुटुंबीयांना 30 हजार अनुदान
Latest Marathi News कोल्हापुरात होणार दिव्यांग भवन Brought to You By : Bharat Live News Media.