भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात
निमिष पाटगावकर
इंग्लंडचा धर्मशाळा कसोटीतील पराभव ही एक औपचारिकता उरली होती ती भारताने तिसर्याच दिवशी पूर्ण केली. कसोटीसाठी आलेल्या पाहुण्यांना दोन दिवस जास्त हिमालयाच्या निसर्ग सान्निध्यात घालवायला मिळाले. जी खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती त्यावर इंग्लंडला साधा प्रतिकारही करायला का न जमावे? जिथे भारतीय फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर उपयोग करून घेतला तसा इंग्लंडला का जमला नाही? ब्रिस्बेन किंवा सेंच्युरियनसारख्या धोकादायक खेळपट्ट्या नसताना मालिकेतील एकही सामना पाचव्या दिवसापर्यंत का गेला नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर हे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळायचा अनुभव हेच आहे. मालिकेची सुरुवात झाली तेव्हा कोहली, शमी यांच्या अनुपस्थितीमुळे आणि मालिका सुरू झाल्यावर अय्यर आणि राहुल यांच्या संघातून बाहेर जाण्याने भारताच्या मधल्या फळीचा टिकाव कसा लागेल, अशी चिंता होती; पण सर्फराज, जैस्वाल, ज्युरेल, पडिक्कल या सर्वांना भारतीय खेळपट्ट्यांवर खेळायचा अनुभव आहे तेव्हा भरत अन् पाटीदारचे अपयश सोडले तर या मालिका विजयात संघातील प्रत्येक खेळाडूचा मोलाचा सहभाग ठरला. राहुल द्रविडने या मालिका विजयानंतर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि सहकार्यांचे विशेष आभार मानले.
भारतात बोर्डाच्या अखत्यारीत होणार्या युवा आणि पुरुष गटातील विविध स्पर्धांतील खेळल्या जाणार्या सामन्यांची संख्या सातशेच्या आसपास आहे. यात आयपीएलचे सामने वेगळे. बोर्डाकडे नोंदणीकृत खेळाडूंची संख्या हजारांत आहे. देशभरातील साधारण पावणेदोनशे मैदानांवर हे स्थानिक क्रिकेट खेळले जाते. तेव्हा अर्थातच आंतरराष्ट्रीय व्यस्त कार्यक्रमामुळे राहुल द्रविड आणि रोहित शर्माला स्थानिक क्रिकेटवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशावेळी निवड समिती जो संघ देईल त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. सर्फराज खान हे नाव कमीत कमी रणजी कामगिरीमुळे सर्वांसमोर होते, पण फक्त 18 प्रथम दर्जाचे सामने खेळलेल्या ध्रुव ज्युरेलची निवड हा मास्टरस्ट्रोक ठरला. ऋषभ पंत नसल्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढायला इशान किशनचा उद्दामपणा आडवा आला, भरत यष्टिरक्षण चांगले करत असला तरी फलंदाजीत कमी पडत होता तेव्हा उत्तम यष्टिरक्षक, फलंदाज, डीआरएस घ्यायला उत्तम साथ देणारा यष्टिरक्षक हवा होता. फिरकी त्रिकुटाचे यश हे उत्तम यष्टिरक्षकावर अवलंबून असते त्यामुळे ज्युरेलचे सर्वांगीण यश दिसायला त्याची निवड कारणीभूत ठरली. भारतीय संघात पुढच्या काही वर्षांत रोहित शर्मा, कोहली, शमी आदी दिग्गज निवृत्तीच्या मार्गाकडे जातील तेव्हा नव्या खेळाडूंच्या खांद्यावर जबादारी देताना हा संक्रमणकाळ खूप महत्त्वाचा आहे. या मालिकेत हा नव्या-जुन्याचा सुरेख संगम बघायला मिळाला. अश्विनने शनिवारी इंग्लिश फलंदाजी मोडून काढल्यावर त्याच्या यशाचे गुपित सांगितले.
भारतातील प्रत्येक मैदानात तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे विविधता आहे तेव्हा चेंडू सोडायची उंची, वेग आणि अॅक्शन यांच्यात वैविध्य आणून गोलंदाजी करायची असते. शंभर कसोटी सामने खेळले तरी अश्विन अजूनही आपल्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे आणायचा प्रयोग करत असतो. गेल्या वर्षी आशिया चषक चालू असताना तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असेच तीन-चार नवी अस्त्रे तयार करण्यात गुंतला होता. गेल्या विश्वचषकातील चेन्नईच्या पहिल्या सामन्यात लॅबूशेनचा बळी आठवून बघा. क्रिकेट हे जितके मैदानात खेळले जाते तितकेच ते मनात खेळले जाते. पहिल्या कसोटीत 190 धावांच्या पिछाडीवरून मैदानात उतरताना ओली पोपने सामना एकहाती फिरवला, पण मालिकेच्या शेवटच्या कसोटीत मालिका अगोदरच हरल्यावर मैदानात उतरलेला संघ 259 धावांच्या भारताच्या आघाडीच्या दबावापुढे मनातून आधीच सामना हरला होता. जेव्हा मन निराशावादी सूर आळवते तेव्हा शारीरिक हालचालीही साथ देत नाहीत. अश्विनने नवा चेंडू हाताळला. नव्या चेंडूची शिवण, टणकपणा वापरत अश्विनने चेंडूची लेंग्थ कमी करून टाकलेला चेंडूने बेन डकेटच्या ऑफ स्टम्पचा वेध घेतला अन् इंग्लंडच्या अध:पतनाला सुरुवात झाली. पुढच्याच षटकात एका गुडलेंग्थ टप्प्यावरून वळवलेल्या चेंडूला इंग्लंडचा यशस्वी फलंदाज क्राऊलीला अंगापासून दूर खेळायला भाग पडले आणि बॅकवर्ड शॉर्टलेगवर आपल्या प्रतिक्षिप्त क्रियेचा उत्तम नमुना दाखवत सर्फराजने झेल टिपला. हा झेल आणि रांचीला हार्टलीला बाद करतानाचा झेल सर्फराजच्या फिटनेसबाबतच्या शंकांवर कायमचे पांघरून घालायला पुरेसे आहेत. यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची परतीची रांगच लागली. जी काय आशा होती ती रूटवर. बॅझबॉलची झूल भरकावून देऊन आपल्या नैसर्गिक चिवटपणाचे प्रदर्शन करत रूट एका बाजूने टिकून होता, पण त्याला साथ द्यायला कोणी टिकत नव्हते. पराभव अटळ दिसताना आपले वैयक्तिक शतक पूर्ण करायच्या नादात तो बाद झाला भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. अश्विनने जरी नऊ बळी सामन्यात मिळवले तरी सामनावीर म्हणून कुलदीप यादवचा यथोचित सन्मान केला हे उत्तम झाले. कारण कुलदीप यादवच्या पहिल्या डावातील जादुई गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूस पहिल्याच दिवशी झुकला. कुलदीप यादव हा दुर्दैवाने भारताचा कायमच उपेक्षित हीरो राहिला आहे. त्याच्या वाट्याला कायमचे स्थान नाही. या मालिकेतील त्याच्या गोलंदाजीची कमाल आणि फलंदाजीतील चुणूक बघता आता तरी कुलदीपला संघात कायमची जागा मिळणे अपेक्षित आहे.
या मालिकेनंतर आता समस्त खेळाडू आयपीएल आणि पाठोपाठ येणार्या टी-20 विश्वचषकात व्यस्त होतील. भारताची पुढची कसोटी मालिका जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध आहे. तोपर्यंत कोहली, राहुल संघात परतले असतील, पण या इंग्लंडविरुद्धच्या सांघिक विजयाने भारताला फलंदाजीत आणि गोलंदाजीत अनेक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिले ज्यांच्या हाती भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित असेल.
Latest Marathi News भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात Brought to You By : Bharat Live News Media.