बारामतीत उड्डाणपुलाचा ’रिस्ट्रिक्टर’ कोसळला
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने ये-जा करू नयेत, या उद्देशाने पालिकेने उभारलेला ‘रिस्ट्रिक्टर’ (लोखंडी कमान) एका कंटेनरमुळे तुटला. बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वारावर तो पडला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी असतानाही पालिका, वाहतूक पोलिस, आटीओ प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने, त्यातून ही घटना घडली. बारामती शहरातील उड्डाणपुलावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार अपघात होत असून अनेक जण यात गंभीर जखमी तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मंगळवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता सातव चौक ते भिगवण रस्त्याला जोडणार्या उड्डाणपुलावर जडवाहतूक करणार्या कंटेनरने या ठिकाणी असलेली लोखंडी कमान तोडली. यामुळे ही कमान दुचाकीवर पडल्याने एक युवक गंभीर जखमी झाला. गेल्याच आठवड्यात उड्डाणपुलाच्या खाली भिगवण रस्त्यालगत एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात घडला होता. या अपघातात जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वाराचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. यात किती लोक जखमी अथवा किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बारामती बाह्य मार्गावरील सातव चौक ते भिगवण रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांची वाहतूक होऊ नये म्हणून याठीकाणी लोखंडी कमान बसवण्यात आली आहे. तीच या कंटेनरने पाडली. यामुळे लोखंडी रॉड तुटून दुचाकीचालकाला लागला. यामध्ये तो गंभीरित्या जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहतूक होऊ नये हे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी लोखंडी कमान बसविताना पुलाच्या दोन्ही बाजूला समान उंचीची बसवण्याची गरज होती. सातव चौक बाजूला जादा उंची तर भिगवण रस्ता बाजूला कमानीची उंची कमी झाली आहे. त्यामुळे सातव चौक बाजूकडून उड्डाणपुलावरून कंपन्यांचे साहित्य ने-आण करणारी अवजड वाहने पुढे जातात. भिगवण रस्त्यालगत कमानीला ते अडकून पडतात.
ही वाहने अडकली की मागे उड्डाणपूल असल्याने आणि लगत मोठमोठ्या अपार्टमेंट असल्याने त्यांना वळण घेता येत नाही. रिव्हर गिअरमध्ये अशी अवजड वाहने सातव चौकापर्यंत मागे न्यावी लागतात. या कालावधीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी बारामती शहराच्या बाह्यमार्ग तयार करण्यात आला. निरा, मोरगाव, पाटस, फलटण या रस्त्याला जाण्यासाठी जडवाहनांना या मार्गाचा वापर होतो. त्यामुळे तुलनेने गर्दी अधिक असते. पालिका प्रशासन, आरटीओ, पोलिस यांनी बारामती शहरातील अपघातांबाबत तो ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. या बाह्यमार्गावरून सध्या उसाचे ट्रक- ट्रॅक्टर वाहतुकीचे कोणतेही नियम न पाळता भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. यावरही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय लोखंडी कमान उभी करताना दोन्ही बाजूंनी ती समान उंचीवर असावी, पुढे ’रिस्ट्रिक्टर’ असल्याने मोठी वाहने जाणार नाहीत हे सांगणारे फलक असले पाहिजेत.
The post बारामतीत उड्डाणपुलाचा ’रिस्ट्रिक्टर’ कोसळला appeared first on पुढारी.
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहने ये-जा करू नयेत, या उद्देशाने पालिकेने उभारलेला ‘रिस्ट्रिक्टर’ (लोखंडी कमान) एका कंटेनरमुळे तुटला. बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वारावर तो पडला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना ये-जा करण्यास बंदी असतानाही पालिका, वाहतूक पोलिस, आटीओ प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने, त्यातून ही घटना घडली. …
The post बारामतीत उड्डाणपुलाचा ’रिस्ट्रिक्टर’ कोसळला appeared first on पुढारी.