विदर्भातील तरुण चित्रकार मनाली बोंडेंच्या आंतरराष्ट्रीय चित्रांचे दिल्लीत प्रदर्शन

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत १२ आणि १३ मार्चला महाराष्ट्रातील तरुण चित्रकार मनाली बोंडे यांचे ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावरील चित्र प्रदर्शन आहे. मनाली यांनी देश विदेशात भ्रमण करून काढलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. या पार्श्वभूमीवर मनाली बोंडे यांनी दिल्लीत ‘ Bharat Live News Media’शी संवाद साधला.
विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्राचे हे प्रदर्शन दिल्लीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन, अमरावती यांच्या वतीने अमरावती येथील चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना असलेल्या विषयावरील चित्रांचे हे प्रदर्शन आहे. १२ आणि १३ मार्चला इंदिरा गांधी राष्ट्रीय केंद्र येथे भरविण्यात येणार आहे.
चित्रकार मनाली बोंडे यांनी १५ वर्षांपूर्वी चित्रकला सुरू केली. व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या मनालीने कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा अनेक देशांमध्ये भ्रमण केले आहे आणि चित्रे काढली आहेत. जगाच्या पाठीवरील विविध देश, तिथली संस्कृती, विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे.
आयजीएनसीएचे डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी मनाली बोंडे यांना जागतिक महिला दिनानिमित्त या आठवड्यात प्रदर्शनी आयोजित करण्यास प्रेरित केल्याचे मनाली यांनी सांगितले तर कला दर्शन विभागाच्या प्रमुख डॉ. रिचा कंबोज यांनी यासाठी प्रोत्साहन दिले. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन महिला चित्रकार मनाली बोंडे यांनी केले आहे.
Latest Marathi News विदर्भातील तरुण चित्रकार मनाली बोंडेंच्या आंतरराष्ट्रीय चित्रांचे दिल्लीत प्रदर्शन Brought to You By : Bharat Live News Media.
