लोकसभेसाठी अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’ला हव्यात 12 जागा!

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 12 जागा हव्या असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत इच्छुक उमेदवारांसाठी नरिमन पॉईंट येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात 5 आणि 6 मार्च रोजी आढावा बैठका झाली. या बैठकीत 16 जागांवर चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात 12 जागा राष्ट्रवादीला सोडल्या जाव्यात अशी मागणी केली गेल्याचे समजते आहे.
मुंबईत होणाऱ्या सर्व बैठकांना पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह महिलाध्यक्ष, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, अल्पसंख्याक, ओबीसी, सामाजिक न्याय विभागांचे राज्यप्रमुख उपस्थित होते.
5 मार्च रोजी गोंदिया भंडारा, नाशिक, दिंडोरी, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, हिंगोली, धाराशिव (उस्मानाबाद), रायगड तर 6 मार्च रोजी कोल्हापूर,माढा, बुलढाणा, सातारा, शिरूर, बारामती, परभणी, अहमदनगर (दक्षिण) आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक पार पडली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी, आमची फाटा फुट झाली असून आता शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार नाहीत, हे जनतेने सुद्धा ध्यानात घ्यावे, असे विधान केले.
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, तुमची वाट वेगळी आहे. आता तुम्ही जातीयवादी पक्षांसोबत गेला आहात. त्यामुळे तुम्ही परत येण्याचा विचारही करू नका. तसा विचार तुमच्या मनात होता का? असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
Latest Marathi News लोकसभेसाठी अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’ला हव्यात 12 जागा! Brought to You By : Bharat Live News Media.
