कोल्हापूरसाठी काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या उच्चस्तरीय बैठकीतही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांमधील 15 जागांच्या वाटपावरून असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरच्या जागेवरून तडजोड झाल्याचे सांगितले जात असले, तरी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. (Lok Sabha Elections 2024) काँग्रेसकडून कोल्हापुरात शाहू … The post कोल्हापूरसाठी काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच appeared first on पुढारी.

कोल्हापूरसाठी काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या उच्चस्तरीय बैठकीतही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांमधील 15 जागांच्या वाटपावरून असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरच्या जागेवरून तडजोड झाल्याचे सांगितले जात असले, तरी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. (Lok Sabha Elections 2024)
काँग्रेसकडून कोल्हापुरात शाहू महाराज यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी शिवसेना ठाकरे गटाने या जागेचा आग्रह कायम ठेवला असून, शाहू महाराज यांनी शिवसेनेतून (ठाकरे) लढावे, यासाठीही हा पक्ष ठाम असल्याचे सांगितले जाते. जागावाटपाचे ‘मविआ’तील भिजत घोंगडे कायम असून, जोवर या तीन पक्षांच्या जागावाटपाचा तिढा सुटत नाही, तोवर वंचितने जागांचा प्रस्ताव देण्याचा वा त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा ‘मविआ’च्या नेत्यांना कोंडीत पकडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 9 मार्चला आघाडीची बैठक होणार असून, त्यात तरी जागावाटप अंतिम होईल का, याकडे या पक्षाच्या नेते वा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जागांवरून रस्सीखेच
काँग्रेस आणि ठाकरे गटात अजूनही कोल्हापूर, रामटेक, हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, शिर्डी, यवतमाळ-वाशिम आदी जागांवरून वाद आहे; तर वर्धा, भिवंडी, माढा या जागांवर काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे 9 मार्चच्या बैठकीत मार्ग निघेल, असे आघाडीचे नेते सांगत आहेत. जागावाटपाच्या चर्चेबाबत आपण समाधानी आहात का, याबाबत स्पष्टपणे उत्तर देण्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिल्याने वंचितला समाधानकारक वाटेल अशा तोडग्यापर्यंत ही चर्चा अद्याप पोहोचली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. जागावाटपाबाबत वंचिततर्फे कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे सांगितले जात असले, तरी शिवसेनेचे संजय राऊत यांनी मात्र वंचितने प्रस्ताव दिला असून, त्यावर बुधवारच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बुधवारी ‘फोर सिझन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) चे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) चे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे प्रमुख नेते या बैठकीला हजर होते.
थोरात यांनी घेतली आंबेडकर यांची भेट
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी दादर येथे प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. आंबेडकर यांनी आघाडीसमोर वेगवेगळ्या अटी ठेवल्याने आघाडीसमोरील पेच वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित आणि आघाडीतील दरी कमी करण्यासाठी थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
‘वंचित’ला सहा जागांचा प्रस्ताव
ठाकरे गट 20, काँग्रेस 20 आणि शरद पवार गट 8 अशा जागांच्या ‘फॉर्मुल्या’वर चर्चा झाली असून, वंचितला ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कोट्यातून प्रत्येकी तीन अशा सहा जागा देण्याची तयारी आघाडीने दाखविली आहे. मात्र, वंचितने किमान आठ जागा तरी मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी रामटेक दिंडोरी, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, दक्षिण मध्य मुंबई यासह दहा जागांची मागणी या बैठकीत केली. या मागणीवर उत्तर देताना सहा जागा देण्यास आघाडीतील अन्य तीन पक्षांनी तयारी दाखवली आहे. परंतु, यावर प्रकाश आंबेडकर यांचे समाधान झाले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितला राज्यात सुमारे 47 लाख मते मिळाली होती. आता यावेळी आमच्या मतांमध्ये आणखी वाढ होणार आहे. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेसच्या अनेक जागा पडल्या होत्या. राज्यात किमान 17 जागांवर आम्ही चांगली लढत देऊ शकतो, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
ठाकरे गट आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन जागा वंचितला देण्याचे आश्वासन दिले. परंतु वंचितचे यावर समाधान झाले नाही.
शरद पवार गटाला 8 जागा
आजच्या बैठकीत 8 जागा शरद पवार गटाला देण्याबाबत चर्चा झाली. यापैकी माढा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर आणि हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना अशा दोन जागा पवार गट सोडणार आहे.
आंबेडकरांचा पत्रकारांनाच प्रतिप्रश्न
या बैठकीतून सुरुवातीला आंबेडकर बाहेर पडले. त्यांना पत्रकारांनी गराडा घातला. मात्र, त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देण्याचे टाळले. सध्या मी काहीही बोलणार नाही. तुम्हाला नंतर माहिती देण्यात येईल, असे आंबेडकर म्हणाले. तुम्ही महाविकास आघाडीसोबत एकत्र लढणार का? या प्रश्नावर मी अजूनही कशातच नाही. पुढच्या बैठकीमध्ये सगळे ठरेल. तरीही पत्रकारांनी तुम्ही बैठकीबाबत समाधानी आहात का? या प्रश्नावर, तुम्हाला माझ्या चेहर्‍यावरून काय वाटते? असा प्रतिप्रश्न केला. (Lok Sabha Elections 2024)
मोदींची हुकूमशाही उलथवून टाकण्यावर एकमत : संजय राऊत
दरम्यान, या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदींची हुकूमशाही उलथवून टाकण्यावर आघाडीचे एकमत आहे. भाजपविरोधात महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे, या एका गोष्टीवर प्रकाश आंबेडकर पूर्ण समाधानी आहेत. आजच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर आघाडीत चर्चा होईल, असे राऊत म्हणाले.
आजच्या बैठकीत लोकसभेच्या 48 जागांवर चार पक्षांमध्ये उत्तम आणि सकारात्मक चर्चा झाली. आघाडीत जागावाटपाविषयी कोणतेही मतभेद नाहीत, आमचे सर्व काही ठरले आहे. जागावाटपाबाबत कोणताही पक्ष वैयक्तिक घोषणा करणार नाही. आघाडीचे जागावाटप एकत्र जाहीर केले जाईल. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत असावी, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आम्ही सर्वांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News कोल्हापूरसाठी काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच Brought to You By : Bharat Live News Media.