निवडणूक आखाड्यातून संभाजीराजेंची माघार
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शाहू महाराज निवडणूक लढवत असतील, तर माझा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट करत संभाजीराजे यांनी निवडणूक लढवणार असल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना बुधवारी पूर्णविराम देत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. शाहू महाराज आपल्या निवडणुकीत माझ्या मागे शंभर टक्के उभे होते, त्यांच्या मागे आपण आता एक हजार टक्के उभे राहणार, असे सांगत ते जो निर्णय घेतील, त्यासोबत आपण आणि आपले कार्यकर्ते कायम राहतील. शाहू महाराज कोल्हापूरला वेगळी दिशा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज यांचे नाव जवळपास अंतिम झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सुपुत्र, माजी खासदार संभाजीराजे यांनी इन्स्टाग्रामवरून वडील आणि स्वतःचा फोटो शेअर केल्यानंतर प्रतिक्रिया देताना बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे घर किती एकसंध आहे, मी पोस्ट केलेल्या फोटोवरून लक्षात आले असेल. त्यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
राज्यात स्वराज्य संघटना कुठेही निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाही, असे सांगत ते म्हणाले, जो निर्णय महाराज घेतील त्यासोबत मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहतील. निवडणुकीचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचे काम थांबवणार नाही, वडिलांसाठी कष्ट करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मी, मालोजीराजे आणि शाहू महाराज असे तिघेही ताकदीने एकत्रित काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराज आमच्यासाठी सर्वस्व आहेत, असे सांगत संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूर हे नेहमी वेगळी दिशा देणारे शहर आहे. ते नेहमीच देत राहणार. कोल्हापूरची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोल्हापूरकरांची आणि शाहू महाराज यांची इच्छा आम्ही सगळे मिळून पूर्ण करू. पूर्ण ताकदीने काम करण्याची हीच खरी वेळ आहे आणि त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण जीवाचे रान करू, असेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराजांच्या वयावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याबाबत संभाजीराजे यांनी उत्तर देताना शाहू महाराजांचे वय विचारत असाल, तर मोदींचे वय किती? अशी विचारणा केली. महाराज निवडणूक रिंगणात का उतरलेत याचा त्यांनी विचार केला असेल. ते अभ्यासू आहेत. ते रोज जोर-बैठका मारणारे पैलवान आहेत. मतदारसंघात पूर्ण क्षमतेने फिरतील. आजही त्यांचा प्रवास खूप असतो, असे त्यांनी सांगितले.
Latest Marathi News निवडणूक आखाड्यातून संभाजीराजेंची माघार Brought to You By : Bharat Live News Media.