योगसाधनेत ‘ओंकार’ जपाचे फायदे
योगसाधनेत प्रणव जप म्हणजे ओंकाराचे खूप महत्त्व आहे. हा जप करताना पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.
स्थळ (जागा) : स्वच्छ, हवेशीर असावी.
आसन : सुती बसकर असावी. एकच आसन वापरावे.
परिसर : प्रदूषणमुक्त गोंगाटविरहीत, शांत असावा.
देह (शरीर) : स्वच्छ अंघोळ करून आणि पोट रिकामे असावे.
देहांतर्गत अवस्था : मन शांत असावे, शारीरिक दुखणे नसावे.
उच्चार : स्पष्ट, दीर्घ.
वेळ : शक्यतो पहाटे अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावा.
याचे उच्चारण कसे आणि किती वेळ करावे? : उच्चारणापूर्वी 1) कोणत्याही ध्यानात्मक आसनात किंवा सुखासनात स्थिर बसावे. 2) पाठीचा कणा ताठ, 3) खांदे ढिले करावे, 4) डोळे अलगद मिटून घ्यावे, 5) संपूर्ण शरीरावरील अतिरिक्त ताण काढून टाकावा, 6) दीर्घ श्वास घ्यावा अणि मग कंठातून सर्वप्रथम अ ऽ ऽ ऽ चे उच्चारण करावे, हे करताना ओठ एकमेकांपासून हलकेच विलग करावेत. त्यानंतर ओठांचा चंबू करावा म्हणजे उ ऽ ऽ ऽ चे उच्चारण सुरू होते आणि पुढे हलकेच ओठ मिटून घ्यावेत. त्यामुळे म ऽ ऽ ऽ कार सुरू होतो. याचे प्रमाण बघायचे झाल्यास समजा दहा सेकंदाचा एक ॐकार म्हणणार असू तर अकार 2 सेकंद, उकार 3 सेकंद व मकार 5 सेकंद म्हणावा. मकार जितका अधिक वेळ लांबवणार, तितके फायदे जास्त मिळतात. यासाठी दीर्घ श्वसनाचा सराव भरपूर करावा. सुरुवातीला हा जप 11 आवर्तने मग 21, 51 असे वाढवत नेऊन नंतर रोज किमान 15 मिनिटांपासून अर्धा तास करावा. रोजच्या ॐ कार जपामुळे शरीरातील उष्णता वाढते. यासाठी रोज दूध, गुलकंद, सब्जा बी यांचे सेवन करावे.
फायदे : शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर जाणवतात.
अ) शारीरिक परिणाम : 1) याच्या कंपनांमुळे Pituitary gland (पियुष ग्रंथी) ला उत्तेजना मिळून संपूर्ण शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. पर्यायाने Thyroid, Sugar, पाळीचे विकार या सर्वांमध्ये संतुलन येत जाते.
2) हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांचे काम सुधारते.
ब) मानसिक : 1) मन शांत व एकाग्र होते. भावना संतुलित रहातात. अर्धा तासाच्या जपानंतर आंतरिक आनंदाची आणि शांततेची वेगळीच अनुभूती प्रत्येक साधकाला येते.
2) मनोकायिक आजार जसे की Phobia, Anxiety, depression हे कमी व्हायला मदत होते.
3) मानसिक ताण कमी होतो.
क) आध्यात्मिक : 1) साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त होते.
2) विषयावरचे मन अधिकाधिक अंतिम सत्याच्या शोधाकडे आकृष्ट होते.
Latest Marathi News योगसाधनेत ‘ओंकार’ जपाचे फायदे Brought to You By : Bharat Live News Media.