कोल्हापूर : पंचगंगा घाटाचा लूक बदलणार
सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक पंचगंगा घाटाचा लूक लवकरच बदलणार आहे. 2 कोटी 50 लाख निधीतून तब्बल 105 मीटर लांबीचा अखंड दगडांचा घाट तयार करण्यात येत आहे. हेरिटेज लूक कायम ठेवून जतन-संवर्धन करत घाट मजबूत केला जात आहे. त्याबरोबरच 3 कोटी 50 लाख निधीतून संपूर्ण घाट आणि आजूबाजूचा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळविण्यात येणार आहे. परिणामी, पंचगंगा घाटाचा कायापालट होणार आहे.
ऐतिहासिक पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. पंचगंगेच्या काठावर प्राचीन मंदिरांचे वास्तुवैभव आहे. ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अजोड नमुना आहेत. याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींची स्मृतिमंदिरेही आहेत. त्यापैकी सर्वात मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांचे आहे. हे मंदिर 1885 साली बांधण्यात आले आहे. घाटाचा परिसर निसर्गरम्य आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे शहरवासीय याठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यासाठी एकवटतात.
पंचगंगा घाट विकास व संवर्धनासाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जुने निखळलेले दगड काढून त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे दगड बसविण्यात येत आहेत. त्याची लांबी 45 मीटर आहे. छत्रपती शिवाजी पुलाकडील बाजूस पिकनिक पॉईंटच्या खाली नव्याने घाट बांधण्यात येणार आहे. जुन्या घाटासारखेच पाच टप्पे असणार आहेत. त्याची लांबी 60 मीटर असेल. संपूर्ण घाटाच्या मागे दगडी कमान बांधली जाणार आहे. त्यामुळे घाटाचा लूक पूर्ण बदलणार आहे. यातून कोल्हापूरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : पंचगंगा घाटाचा लूक बदलणार Brought to You By : Bharat Live News Media.