नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहे. नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथे गत काही दिवसांपासून कोंबड्यांमध्ये तुरळक मरतुकीचे प्रमाण आढळून आले. २ मार्च रोजी मरतुक जास्त प्रमाणात आढळल्यामुळे मृत पक्षी अन्वेषणासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. जी मरतुक झाली त्याचे नमुने NIHSAD भोपाल येथे पाठविण्यात आले . तपासणीअंती नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतुक एव्हियन इन्फ्ल्युएन्झा (बर्ड फ्लू) मुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी प्राण्यांमधील संक्रमण व रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखड्यानुसार प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रापासून एक किलोमीटर परिसर हा बाधीत क्षेत्र म्हणून घोषीत केला. यासोबतच दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.
जिल्हाधिकारी डॅा. इटनकर यांनी कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाला दिले. कुक्कुट शेड निर्जंतुकीकरण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन बाधीत क्षेत्रातील कुक्कुट पक्षी खाद्य खरेदी, वाहतूक, बाजार, जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास पुढील २१ दिवसांपर्यंत प्रतिबंधही लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर त्रिज्येतील निगराणी क्षेत्रात अबाधित क्षेत्रामधून कुक्कुट पक्षी, अंडी व कुक्कुट खाद्य यांच्या वाहतुकीस मज्जाव राहणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार जिल्हात शिघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली. 4 मार्च रोजी रात्री 9 वाजेपासून अंडी उबवणी केंद्र नागपूर येथील उर्वरित पक्षी नष्ट करण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून 5 मार्च रोजी अखेरपर्यंत येथील एकूण ८ हजार ५०१ पक्षी व १६ हजार ७७४ अंडी तसेच ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट करण्यात आले आहे. याशिवाय 6 मार्च रोजी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूर संस्थेच्या संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण पूर्ण करण्यात आले. दुसरीकडे याशिवाय जिल्हात कुठेही असामान्य मरतुक आढळून आलेली नाही. शेतकरी व पशुपालक यांनी घाबरुन न जाता जागरुक राहणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नागपूर यांनी केले आहे.
Latest Marathi News नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र बर्ड फ्लू बाधीत Brought to You By : Bharat Live News Media.