बीड : धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरात बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण
आष्टी; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील धानोरा येथे दिवसाढवळ्या शेतात बिबट्या आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. तर अनेक वेळा बिबट्या आढळून देखील वनविभागाकडून कसलीच उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. पाहणीचा देखावा करणारा वनविभाग नेमका काय करतोय? असा प्रश्न गावांतून उपस्थित केला जात असून दिवसाढवळ्या बिबट्याने धानोराकरांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धानोरा येथील गायकवाड मळा या शेतात बुधवारी भर दुपारी बिबट्या आढळून आला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. दोन दिवसांपूर्वी नांदूर विठ्ठलाचे येथे एक बिबट्या आढळून आला होता. हा बिबट्या तोच असल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या नांदूर विठ्ठलाचे या परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्या आढळून आला होता. काही तरुणांनी कॅमेऱ्यात त्याचे चित्रीकरण केले. दरम्यान, नांदूर विठ्ठलाचे, धानोरा परिसरात बिबट्या आढळून आला आहे. शेत कामे करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.
Latest Marathi News बीड : धानोरा, नांदूर विठ्ठलाचे परिसरात बिबट्याचे दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण Brought to You By : Bharat Live News Media.