12 वर्षाच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोडलं, मोहितने दाखवलेल्या धाडसाचं होतय कौतुक
मालेगाव (जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- वेळ सकाळची… आताच कुठे कार्यालय उघडलेले… मोबाइलवर गुंग मुलाच्या पुढ्यातून गुरगुरत बिबट्या आस्तेकदम जातो अन् अंगावर शहारा येतो. पण, तारांबळ उडण्याऐवजी तो मुलगा शांत राहतो. या निरव शांततेत बिबट्या खोलीत शिरतो अन् मुलगा क्षणाचाही विलंब न करता दाराची कडी लावतो आणि बिबट्या बंद होतो. हा थरकाप उडवणारा घटनाक्रम प्रथमच मालेगावच्या वेशीवर घडला.
मालेगाव – नामपूर रस्त्यावरील मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. ५) सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. शहराजवळ गेल्या अनेक वर्षांनंतर बिबट्याचे दर्शन झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. भक्ष्य व पाण्याच्या शोधात बिबट्याने थेट मालेगावपर्यंत मजल मारल्याची ही घटना साई सेलिब्रेशन हॉलमध्ये घडली. या हॉलला लागूनच कार्यालये व इतर गाळे आहेत. रखवालदार विजय अहिरे यांचा मुलगा मोहित (१2) हा कार्यालयात मोबाइल पाहण्यात गुंग होता. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालयच उघडे होते. अचानक बिबट्या डरकाळ्या फोडत मोहितच्या जवळून कार्यालयात शिरला. मोहितने श्वास रोखत त्याला आत जाऊ दिले अन् न घाबरता हळूच उठून दरवाजा बंद करत कार्यालयाबाहेर धूम ठोकली. त्यानंतर त्याने वडिलांना बिबट्या कार्यालयात बंद केल्याची माहिती दिली. त्यांनी कार्यालयाच्या संचालकांना कळवले अन् वनविभागाला माहिती गेली. नाशिक येथून रेस्क्यू पथकाला बोलावण्यात आले. तत्पूर्वी, कार्यालयात बिबट्या कोंडल्याची माहिती मिळताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती. वनविभाग व महापालिकेच्या अग्निशमन दलासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीला पांगवत परिसर मोकळा केला. सुमारे १०.३० च्या दरम्यान रेस्क्यू पथक दाखल झाले. या पथकातील डॉ. मनोहर नागरे, वैभव उगले, मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, अग्निशमन दलाचे संजय पवार यांच्यासह पोलिस अधिकार्यांनी बिबट्या असलेल्या परिसराची पाहणी केली. नंतर त्या बंद दरवाजाबाहेर पिंजरा असलेले वाहन उभे करण्यात आले. कार्यालयातील उघड्या खिडकीतून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध केले. त्यानंतर वनकर्मचार्यांनी बेशुद्ध बिबट्याला उचलून पिंजर्यामध्ये सुरक्षितरीत्या बंद केले. दोन तासांच्या परिश्रमानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हा बिबट्या साधारण 3 ते 4 वर्षांचा, तो नर जातीचा आहे. त्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे. तो तंदुरुस्त झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात मुक्त केले जाईल. – वैभव हिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव
——-०——–
Latest Marathi News 12 वर्षाच्या चिमुरड्यानं बिबट्याला कोडलं, मोहितने दाखवलेल्या धाडसाचं होतय कौतुक Brought to You By : Bharat Live News Media.