दुष्काळात तेरावा महिना, आग लागून तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक
सिन्नर(जि. नाशिक);Bharat Live News Media वृत्तसेवा- तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) येथे मंगळवारी (दि. ५) दुपारी ज्वारीच्या चाऱ्याला आग लागून सुमारे तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला. त्यामुळे संदीप निवृत्ती ढमाले यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
फुलेनगर येथील संदीप ढमाले यांनी ज्वारीच्या शेतातून सोंगणीनंतर तीन ट्रॅक्टर चारा खळ्यात टाकला होता. ढमाले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य जेवणासाठी घरी गेले. त्यानंतर काही वेळात चाऱ्याच्या बाजूने धूर दिसल्याने ढमाले यांनी चाऱ्याच्या दिशेने धाव घेतली. चारा वाळलेला असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.
ढमाले यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. तलाठी तरटे यांनी घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा केला.
दुष्काळात तेरावा महिना
सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतानाच चारा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
हेही वाचा :
वेध लोकसभेचे : कवीमनाचे खासदार हरिहरराव सोनुले
आढळरावांच्या लोकसभा उमेदवारीचे भवितव्य अजूनही गुलदस्त्यात
ओ बुलाती हैं, मगर जाने का नही; फोटो पाठवून करायची घायाळ, ‘तो’ जाळ्यात येताच दोघे करायचे ‘अशी’ शिकार
Latest Marathi News दुष्काळात तेरावा महिना, आग लागून तीन ट्रॅक्टर चारा जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.