आढळरावांच्या लोकसभा उमेदवारीचे भवितव्य अजूनही गुलदस्त्यात
संतोष वळसे पाटील
मंचर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी सोमवारी (दि. 4) आंबेगाव तालुक्यात आले, त्या वेळी शेतकरी मेळाव्यात ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार जाहीर करतील, ही अपेक्षा होती. परंतु, त्यांनी उमेदवारीचे सूतोवाचही केले नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर होईल, याची सत्ताधारी पक्षासह विरोधकांमध्येही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सहकारमंत्री वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अजित पवार यांनी एकत्र दुपारचे जेवणही घेतले. या वेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आढळराव कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत होते. त्यांचे वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक देवेंद्र शहा यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याने त्यांच्यात बराच वेळ गप्पा सुरू होत्या.
दरम्यान, आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या स्वागतापासून, तर दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमापर्यंत त्यांच्याबरोबर असल्याने अजित पवार शेतकरी मेळाव्यात त्यांची उमेदवारी जाहीर करतील. त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, पवार यांनी त्यांच्या भाषणात आढळराव पाटील यांच्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकते. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने कामाला लागावे आणि या ठिकाणी दिलेल्या महायुतीचा उमेदवार निवडून द्यावा, असे आवाहन केले. मात्र, उमेदवाराचे नाव गुलदस्तात ठेवल्याने पुढील काही दिवस शिरूर लोकसभेच्या जागेबाबत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार?
आढळराव पाटील खासदारकी लढवणार; मात्र ती कोणत्या चिन्हावर लढवणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. शिरूर लोकसभेसाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल? याबाबत अधिकृत दुजोरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते तयार नसल्याचे दिसून येते.
हेही वाचा
शिरूर लोकसभेसाठी भाजपकडून महेश लांडगे यांचा आग्रह
शिक्षक भरती : ९७३ उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करणार
Nashik Krushi News | कृषी पर्यटन ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान
Latest Marathi News आढळरावांच्या लोकसभा उमेदवारीचे भवितव्य अजूनही गुलदस्त्यात Brought to You By : Bharat Live News Media.