मेट्रोचा पहिला मार्ग पूर्ण : वनाजपासून रामवाडी 36 मिनिटांत गाठता येणार
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वनाज ते रामवाडी या 16 कि.मी. मेट्रो मार्गातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 6) सकाळी ऑनलाइन केले जाणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील मेट्रोच्या दोनपैकी पहिला मार्ग पूर्ण झाला आहे. रुबी हॉल ते रामवाडी स्टेशनपर्यंतची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हर्डीकर बोलत होते. हा मार्ग दुपारी बारापासून पुणेकरांसाठी खुला होणार आहे. आता वनाज ते रामवाडी असा साडेसोळा किलोमीटर अंतरात 16 स्टेशन्स असून, या मार्गावर प्रवासासाठी 30 रुपये तिकीट असणार आहे, तर 36 मिनिटांचा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.
सिव्हिल कोर्ट ते मंडईमार्गे स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम 99 टक्के पूर्ण झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते, त्या काळात मार्ग सुरू करता येणार नाही. त्यामुळे मे महिन्यानंतर हा मार्ग खुला होऊ शकतो, असेही हर्डीकर यांनी सांगितले.
रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौक विस्तारित मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला. तो मंत्रिमंडळासमोर मांडला असून, आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यास तो प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. रामवाडी ते विमानतळ फिडर सेवा देण्यासाठी पीएमपीएमएलच्या अधिकार्यांसोबत चर्चा सुरू असून, दोन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, प्रवशांनी शेअर ऑटोचा वापर करावा, असे आवाहनही श्रावण हर्डीकर यांनी केले.
तीन तास ऑनलाइन तिकीट सेवा बंद असणार
सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत ऑनलाईन तिकीट सेवा बंद असणार आहे. तसेच, सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल आणि रुबी हॉल ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर मेट्रो सेवा ही बंद असणार आहे. इतर मार्गांवरील मेट्रो सेवा सुरू असणार आहे. त्यासाठी स्थानकावरील पर्यायी तिकीट खिडकी, किऑस्क मशिन, तसेच स्वयंचलित तिकीट व्हेडिंग नियमित सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
रुबी हॉल ते रामवाडी तिकीट दहा रुपये
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. यातील येरवडा हे स्थानक तात्पुरते बंद असणार आहे. या मार्गावरील 5.5 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी 12 मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यासाठी दहा रुपये तिकीट असणार आहे.
पिंपरी-निगडी मार्गाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पिंपरी ते निगडी या 4.43 कि.मी. अंतराच्या मार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्यासाठी पिंपरी स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गाचे काम पुढील तीन वर्षांत म्हणजेच 2027 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हेही वाचा
महायुद्धे, स्पॅनिश फ्ल्यू, कोव्हिडच्या संकटानंतर त्यांना कळले आरोग्याचे महत्त्व
व्हीआयपी संस्कृतीवर अंकुश हवा!
Kisan Andolan : देशभरातील शेतकऱ्यांचा आज पुन्हा दिल्लीकडे मोर्चा
Latest Marathi News मेट्रोचा पहिला मार्ग पूर्ण : वनाजपासून रामवाडी 36 मिनिटांत गाठता येणार Brought to You By : Bharat Live News Media.