तडका : प्री-वेडिंग… कोट्यवधीची उधळण
गेले आठ दिवस झाले संपूर्ण भारतातील जनता मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचे लग्न, नव्हे नव्हे, प्री-वेडिंग, डोळे भरून टीव्हीवर आणि समाजमाध्यमांमध्ये पाहत आहे. केवळ देशभरातील नव्हे, तर अगदी जगभरातील सेलिब्रिटी या लग्नाला नव्हे, प्री-वेडिंगला आवर्जून उपस्थित राहिले याची चर्चा सर्वत्र होत आहे. आता प्री-वेडिंग एवढे मोठे असेल तर लग्न केवढे मोठे होईल, याचा विचार न केलेलाच बरा. मार्क झुकरबर्ग आणि बिल गेटस्पासून ते अमिताभ बच्चन, अक्षयकुमारपर्यंत सर्व प्रकारच्या सेलिब्रिटीजनी या प्री-वेडिंगला जामनगर, गुजरात येथे हजेरी लावली. सामान्य लोकांचे डोळे पांढरे करणारा हा विवाहपूर्व सोहळा सुमारे 1000 कोटी रुपयांच्या खर्चाचा आहे आणि 1000 कोटी रुपये हा भाग अंबानींच्या प्रॉपर्टीचा केवळ 0.1 टक्का एवढाच हिस्सा आहे.
आपल्यासारख्या सामान्य लोकांना मोठमोठे सेलिब्रिटी नाचताना दिसतात ते पाहायला काय त्रास आहे? ‘शादी किसी की भी हो, दिल अपना गाता है’ अशी आपली हालत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अंबानी यांचे व्याही काय करत असतील? तेही तसे मोठेच आहेत. त्यांचाही व्यवसाय आहे आणि तोही काही हजार कोटींमध्ये आहे; पण या लग्नपूर्व सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अंबानींनी आपल्या गावाकडे म्हणजे जामनगरला घडवून आणला. जामनगर येथे विमानतळ आहे आणि केंद्र शासनाने विशेष तरतूद म्हणून पंधरा दिवसांसाठी या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा दिला आहे.
आलेले लोक इतके मोठे होते की, ते काही विमान प्रवास करून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद असे करत जामनगरला गेले नाहीत, तर थेट आपली व्यक्तिगत विमाने घेऊन जामनगर विमानतळावर उतरले. खाण्यापिण्याची रेलचेल, पाहुण्यांची राहायची शाही व्यवस्था आणि या सगळ्यांच्या बरोबर अंबानी कुटुंबाची नम्रता आणि अगत्य यामुळे संपूर्ण देश तसा भारावून गेला आहे. अमेरिकेमधील रिहाना नावाच्या नर्तिकेने या सोहळ्यामध्ये एका गाण्यावर नृत्य करण्यासाठी 74 कोटी रुपये घेतले, अशी चर्चा आहे. देणारा देत असेल आणि घेणारा घेत असेल तर आपल्याला काय त्रास आहे! आपण आपले टीव्हीवर बेधुंद नृत्य पाहून डोळ्यांचे पारणे फेडून घेतले.
अंबानींच्या सूनबाई आणि चिरंजीव यांचे वागणे पाहून अख्खा देश भारावून गेला. अनंत अंबानी जे भावोत्कट बोलले, ते ऐकून वडील मुकेश अंबानी यांच्या डोळ्यांत पाणी आलेले सर्व जगाने पाहिले. अहो, श्रीमंत असले तरी काय झाले, बाप-लेकाचे नाते तर कुठेही सारखेच असते ना! उलट आपल्यासारखी सामान्य माणसे डोळ्यांत पाणी आले की, रडून मन मोकळे करून घेतात. या मोठ्या लोकांना तशीही सोय नसते; पण कितीही मोठे असले तरी संवेदनांच्या बाबतीत आणि भावनाप्रधानतेच्या बाबतीत छोटे आणि मोठे सारखेच असतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले. आणि खरे सांगायचे तर हीच आपल्या देशाची संस्कृती आहे.
आपल्या ग्रामीण भागातसुद्धा लग्नाच्या वरातीसाठी डीजे लावून लाखो रुपये खर्च करणारे लोक आहेतच. काही गब्बर लोक लग्नासाठी वधू आणि वराचे आगमन हेलिकॉप्टरमधून करण्याची सोय करतात. तेही आपल्यापरीने खर्च करत असतात. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न थाटात व शानदार व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. तशी अंबानी यांनाही इच्छा झाली असेल.
Latest Marathi News तडका : प्री-वेडिंग… कोट्यवधीची उधळण Brought to You By : Bharat Live News Media.