वेध लोकसभेचे; दोन तुळशीराम, एक तुळशीदास

उमेश काळे
1962 च्या लोकसभा निवडणूकमराठवाड्यात काँग्रेस पक्षासाठी तशी एकतर्फीच ठरली. पं. नेहरूंची लोकप्रियता, कमकुवत झालेले विरोधी पक्ष ही त्याची काही कारणे असावीत. भाऊराव देशमुख (छत्रपती संभाजीनगर), द्वारकादास मंत्री (बीड), रामराव नारायणरावलोणीकर (जालना), तुळशीराम कांबळे(लातूर), तुळशीदास जाधव (नांदेड), तुळशीराम पाटील (धाराशिव), शिवाजीराव देशमुख (परभणी) यांनी 62 च्या निवडणुकीत या प्रदेशाचे प्रतिनिधीत्व केले. संभाजीनगरातून निवडून आलेले भाऊराव हे भोकरदनचे रहिवासी. त्यांनी रिपाइंचे बाळासाहेब मोरे यांचा 68 हजार मतांनी पराभव केला. देशमुख हे 67 च्या निवडणुकीतही विजयी झाले.
( संग्रहित छायाचित्र : स्थायी, असंप्रादयिक, प्रगतिशील राष्ट्र के लिए काँग्रेस को वोट दो ही प्रमुख घोषणा 1962 ला काँग्रेसची होती. या घोषणा आणि नेहरूंची छबी असणारे पोस्टर्स लावत काँग्रेस उमेदवारांनी प्रचार केला. )
बाबासाहेब भोसलेंचे सासरे विजयी
या निवडणुकीत बार्शीचे तुळशीदास जाधव हे नांदेडातून विजयी झाले हे विशेष. तुळशीदास जाधव हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि म. गांधी पुण्यात अटकेत असताना त्यांचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. 1947 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्यासह शेकापमध्ये प्रवेश केला. दहा वर्षानंतर 1957 ला ते परत काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने त्यांना सोलापुरातून उमेदवारी दिली होती, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 62 ला त्यांना काँग्रेसने नांदेडातून तर 67 ला बारामतीमधून उमेदवारी दिली. या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या. जाधव यांचे दिल्लीतील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी संबंध होते. बाबासाहेब भोसले यांचे ते सासरे. बॅ. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेब हे कायदामंत्री होती. अंतुले यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या जावयाचे बाबासाहेब भोसले यांचे किमान मंत्रीपद तरी कायम रहावे म्हणून जाधव हे इंदिरा गांधी व अन्य नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून होते. परंतु जेव्हा मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाली तेव्हा बाबासाहेबांचे नाव पक्ष नेते जी. के. मूपनार यांनी सांगितले. आपले जावई सीएम झाल्याचे तुळशीदासजींनाही आश्चर्य वाटले. अर्थात् अंतुले यांना आपले ऐकणारा मुख्यमंत्री पदावर हवा होता. बाबासाहेब हे बॅरिस्टर आहेत, प्रभावी इंग्रजी बोलतात असे त्यांनी इंदिराजींना पटवून दिल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जाते. (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा वेगळा विषय आहे.)
रिपाइं दोन नंबरवर
62 च्या निवडणुकीचे विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या रिपाइंचे उमेदवार तीन मतदारसंघात दुसर्या क्रमांकावर होते. संभाजीनगर, नांदेड, लातूर हे ते मतदारसंघ. जालना, परभणी, धाराशिव येथे शेकाप दुसर्या स्थानी राहिला. परभणी, धाराशिव, नांदेडच्या काही भागात शेकापचे प्राबल्य होते. पहिल्या निवडणुकीत या पक्षाचा एक उमेदवार लोकसभेत पोहचला होता. या पक्षाचे मातब्बर नेते अण्णासाहेब गव्हाणे, उद्धवराव पाटील हे पराभूत झाले. बीड मतदारसंघात व्दाकदासजी मंत्री यांनी भाकपला पराभूत केलेे.
लोणीकरांची लॉटरी
दोन तुळशीराम आणि एक तुळशीदास हे मराठवाड्यातून निवडून गेलेले. नामसाधर्म्याचा भाग सोडला तरी या लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा पक्ष व सरकार पातळीवर आपला ठसा उमटविला होता. लातूर हा राखीव मतदारसंघ होता. तेथे काँग्रेसने उदगीरचे तुळशीराम कांबळे यांना उमेदवारी दिली होती, लगत असलेल्या धाराशिवमधून तुळशीराम पाटील यांनी बाजी मारली. जालन्यात रामराव नारायणराव लोणीकर (यादव) यांचा विजय झाला. पुढे लोणीकर हे परभणीतून दोन वेळा लोकसभेवर, एकदा विधिमंडळात निवडून गेले. विविध महामंडळावर त्यांनी काम केले. लोणीकर हे आपल्या आडनावात यादव असे लावत असत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त असली तरी यादव नाव पुढे आल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठी लोणीकरांना उमेदवारी देत. (उ. प्र. मधील नेते केंद्रीय कार्यकारिणीवर होते. यादव हे नाव उत्तरेत लोकप्रिय आहे.) व्दारकादास मंत्री हे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. परभणीतून निवडून आलेले शिवाजीराव हे कळमनुरीचे. कळमनुरी सारख्या मागास भागात त्यांनी डोंगरकडा साखर कारखान्याची स्थापना केली.
हेही वाचा
बिहारमधील राजकारणावर प्रशांत किशोर यांचे मोठे भाकीत; ‘भाजपसह मित्र पक्ष आगामी काळात…’
Lok Sabha Election 2024 : मतदान करताना भारतीय महिला नवऱ्याचा ‘आदेश’ मानतात का? निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो?
Lok Sabha Election 2024 | उत्तरेतील दिग्गजांना शह देत दाक्षिणात्य पी. व्ही. नरसिंह राव कसे बनले होते पंतप्रधान?
Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; निझामाविरोधात लढणार्या स्वातंत्र्यसेनानींना संधी
Latest Marathi News वेध लोकसभेचे; दोन तुळशीराम, एक तुळशीदास Brought to You By : Bharat Live News Media.
