प्राण्यांवर होतायेत धोकादायक जीवघेणे हल्ले; बकरीचा फडशा

पिंपळनेर, जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा
पिंपळनेरपासून चार कि.मी जवळच असलेल्या देशशिरवाडे-बल्हाणे शिवारात बिबट्याने बकरीचा फडशा पडल्याने ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून देशशिरवाडे शिवारात बिबट्याचा वावर असून बिबट्याने मानवी वस्तीत प्रवेश केला आहे. सोमवार (दि.4) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास देशशिरवाडे येथील रामचंद्र भावडू सोनवणे यांच्या शेतातील घराजवळ कांदा चाळीतील बकरीचा बिबट्याने फडशा पाडला.
सोनवणे यांच्या मालकीचे गाई ,म्हशी, बैल असे इतर पाळीव प्राण्यांचा गोठा आहे. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही. मात्र दोन दिवसांपूर्वीच या शेतकऱ्याच्या मालकीचे दोन लहान बोकड बेपत्ता झाले असून त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. ही बाब लक्षात घेता सोनवणे यांनी सोमवार (दि.4) रात्री एक बकरी कांदा चाळीत बांधून ठेवली. बिबट्याने जाळी तोडून आत प्रवेश केला व बकरीचा फडशा पाडला. या घटनेत त्यांचे मोठे पशु नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर सकाळी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याच परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतातील सालदाराने मक्याच्या शेतात बिबट्याला बघितल्याचे सांगितले. सुदैवाने बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केलेला नाही परंतु बिबट्याची दहशत कायम आहे.
वन्य प्राण्याचा संचार वाढला
सध्या गहू व कांदा पिकांचे उत्पादन शेतकरी घेत असल्याने शेतकरी औषधी फवारणीसाठी, पाणी भरण्यासाठी व राखण करण्यासाठी शेतात जात असतात. मात्र बिबट्याचा त्यांच्यावर हल्ला नाही. देशशिरवाडे-बल्हाणे शिवारात बिबटयाचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.
तालुक्यातील या भागात बिबट्यांचा वावर
देशशिरवाडे, कड्याळे, शेलबारी, देगांव, चिकसे, जिरापुर, कासारे या भागात आश्रयाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या परिसराला लागूनच अनेक घरे असल्याने तेथील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता देखील वर्तविली आहे. बिबटया पिण्याचे पाणी व भक्ष्याच्या शोधात पिंपळनेरच्या मानवी वस्तीकडे येत असून या भागात मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने ते याच भागात मुक्त संचार करीत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्या रात्रीच्या वेळीच परिसरात दिसू लागल्याने लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
जीवाला धोका
या भागातील शेतकरी व ग्रामस्थ भीतीपोटी संध्याकाळी घराबाहेर जाणे ही टाळू लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने संभाव्य घटना घडण्यापूर्वीच बिबट्याचा बंदोबस्त करावा. तर रात्रीच्या वेळी वीज प्रवाह खंडित होत असल्याने सर्वत्र अंधार पडतो. परिणामी हिंस्र प्राण्यांचा वावर वाढतो व शेतक-यांना जीव मुठीत धरावा लागतो आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज पुरवठा सुरु असू द्यावा जेणेकरून सर्वांना सुरक्षितता मिळू शकेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. येथील बहुतांश लोकांचा शेती व्यवसाय असून त्यांना शेतात जाणे क्रमप्राप्त असते. परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी रात्री-अपरात्री शेतात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे.
या ठिकाणी बिबट्याचे दर्शन नित्याचेच
साक्री तालुक्यातील सामोडे, कड्याळे, देशशिरवाडे, बल्हाणे, शेलबारी, कासारे, कोडाईबारी, चिकसे, जिरापूर आदी भागात बिबट्याचा मुक्त संचार नित्याचाच झाला आहे.
वनविभागाचा सल्ला
फटाके फोडणे, डब्याचा आवाज पुरेसा प्रकाश, मिर्चीचा धूर, शेकोटी करुन बिबटबाला तेथून पळविण्यास मदत होऊ शकते अशी माहिती पिंपळनेर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. आर.अडकीने यांनी दिली आहे.
Latest Marathi News प्राण्यांवर होतायेत धोकादायक जीवघेणे हल्ले; बकरीचा फडशा Brought to You By : Bharat Live News Media.
