Lok Sabha Elections : भाजप उमेदवाराच्या निवडीची उत्सुकता शिगेला..!
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातील भाजप उमेदवाराच्या निवडीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रदेश भाजपकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला असतानाच दिल्लीत मात्र आणखी एका उमेदवाराच्या नावाची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजपचा पुणे लोकसभेचा उमेदवार ‘डार्क हॉर्स’ तर ठरणार नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. त्यात पुणे लोकसभेच्या उमेदवारीची शर्यत आणखीच तीव्र बनत चालली आहे. पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे आणि माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे प्रमुख इच्छुक आहेत. यामधील दोन इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती, त्यामधील एका नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून, प्रदेश पातळीवरून या नावाची शिफारस दिल्लीकडे करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत मात्र या नावाव्यतिरिक्त इच्छुक नसलेल्या पुण्यातील एका पदाधिकार्याच्या नावाची चाचपणी सुरू आहे. गतआठवड्यात या पदाधिकार्याने दिल्लीवारी केली असून, काही प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते. त्यामुळे आयत्यावेळी दिल्लीत या पदाधिकार्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाला, तर तो उमेदवारीच्या शर्यतीत थेट ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतो. मात्र, या पदाधिकार्याने लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने अद्याप कोणतीही तयारी केलेली नाही. त्यामुळे ज्या नावांची पुण्यात चर्चा आहे त्यांना
डावलून थेट इच्छुक नसलेल्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याची रिस्क केंद्रीय नेतृत्व घेणार का,
याबाबत साशंकता आहे.
इच्छुक लागले प्रचाराला
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काहींनी तर थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. एका इच्छुकाला पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे. गतआठवड्यात या इच्छुकाने सर्व मित्रपरिवार व नातेवाइकांची भेट घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची तयारी केली, तर दुसर्या इच्छुकांकडून महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांच्या वैयक्तिक भेटीगाठींचा सपाटाच लावला आहे. तर, काहींनी कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला प्रचार चालविला आहे.
सर्व्हेतही हा पदाधिकारी आघाडीवर
भाजपकडून पुण्यात उमेदवारीसाठी दोन सर्व्हे करण्यात आले. त्यात इच्छुकही नसलेल्या आणि चर्चेतही नसलेल्या पदाधिकार्याचे नाव आघाडीवर होते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. सर्व्हे प्रामुख्याने निवडून येण्याची क्षमता, उमेदवारी प्रतिमा, शिक्षण आणि सर्वसमावेशक चेहरा या निकषावर झाला होता. या सर्व निकषात हा पदाधिकारी सरस ठरल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा
एक महिन्यापूर्वी कुत्रा चावला; रेबीजची लस देऊनही मृत्यूने गाठले
कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज?
नागपूर : भरधाव ट्रकने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला चिरडले
Latest Marathi News Lok Sabha Elections : भाजप उमेदवाराच्या निवडीची उत्सुकता शिगेला..! Brought to You By : Bharat Live News Media.