PSI मुलाखतीची तयारी
प्रा. जॉर्ज क्रूझ
2021 मध्ये झालेल्या PSI पूर्व परीक्षेच्या 376 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 12 मार्च 2024 ते 20 मार्च, 2024 या दरम्यान मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. PSI शारीरिक चाचणी पात्र करणार्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.
मुलाखतीची तयारी करणार्या उमेदवारांनी तयारी करत असताना काही गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, पदवीचा विषय त्याचा सखोल अभ्यास, नोकरी करत असल्यास त्याचा तपशील, आई-वडिलांची माहिती, गाव, तालुका, जिल्हा, भौगोलिक विभाग, महाराष्ट्र राज्याविषयी घडामोडी, भारतातील घडामोडी यांचा सखोल व विश्लेषणात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. सर्व प्रथम स्वत:वर 1000 प्रश्न काढा व त्याची सविस्तर उत्तरे लिहून काढा. स्वत:वर विश्वास ठेवा. अधिक बोलण्याचा सराव करा. पेहराव साजेसा करा. शूज व ड्रेस निवड करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. 40 गुणांच्या मुलाखतीचे विश्लेषण करावयाचे झाल्यास 10 गुण Bio-Data, यामध्ये तुमचे शिक्षण व तुमचे एकूण व्यक्तिमत्त्व 10 गुण पोलिस प्रशासनाविषयी माहिती. यामध्ये पोलिस महासंचालक ते पोलिस या पदाची सर्व माहिती व अलीकडील बदल. 10 गुण चालू घडामोडी व एकंदर तुमचे सादरीकरण सर्वसाधारण उमेदवार या 30 गुणांपैकी 22 ते 24 पर्यंत गुण घेऊ शकतो. जे 10 गुण मुलाखत घेण्याकडे राखीव आहेत. म्हणजेच तुमचे त्या विषयाचे ज्ञान- सादरीकरण, पेहराव Self Confidence आणि तुम्ही या पदाला कसे योग्य आहात. एकूण तुमच्या Attitude वर अवलंबून आहेत. मुलाखतीची तयारी करत असताना, दररोज 2 ते3 वर्तमानपत्राचे वाचन करायला हवे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे लिहून काढणे आवश्यक आहे. अलीकडे संसदेत झालेले कायदे, विधेयके, फौजदारी कायदे बदलण्यात आले त्याविषयीची माहिती, बाबरी मशीद व अयोध्या राममंदिर, कृष्णजन्म भूमी विवाद, बिल्कीस बानो प्रकरण, कोप परिषद पॅरिस, जागतिक तापमान वाढ, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष, विविध देशांचे नवनियुक्त राष्ट्रभाषा, UNO ची नेमकी भूमिका, 370 कलम.
लोकसभा निवडणूक, आचारसंहिता, लोकायुक्त पदाचे महत्त्व, हाजी मंगल दर्गावाद, महत्त्वाचे पुरस्कार, मनोधैर्य योजना, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, सायबर गुन्हे व आव्हाने, 16 वा वित्त आयोग मराठा आरक्षण, पक्ष फुटी, राजकारणातील दोष, पक्षांवर बंदी, लोकसभा व विधानसभा एकत्र निवडणूक आवश्यक का अनावश्यक, सन 2025 पासून MPSC राज्यसेवा वर्णनात्मक असावी योग्य की अयोग्य, बेराजगारी, वाढते गुन्हेगारीकरण, वाढत्या सामाजिक समस्या अशा सर्व विषयांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा. शक्य असल्यास अधिक मुलाखती घ्यावात. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे उमेदवार आहात तो जिल्हा त्याची ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी या सर्वांचा अभ्यास करावा. या अगोदर झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा अभ्यास करावा.
आपण PSI पदासाठी राजकारणातील नीतीमूल्यांची घसरण व तुमचा त्याकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन. तुम्ही कोणत्याही परिस्थितीचे उत्तर देताना मध्य साधता आला पाहिजे, उत्तर एकांगी नको, बरे बोलण्यापेक्षा खरे बोला, मुलाखत घेणारे हे सर्वजण अनुभवी असतात व यामध्ये IAS व IPS दर्जाचे अधिकारी ही असतात. तुम्हाला कोणाचे पॅनेल येईल हे सांगता येत नाही. त्यापुढे सर्व सदस्यांंच्या विषयाची माहिती मिळवा व त्याचा प्रश्नविचारांचा Approach बघून घ्या. मा. देवानंद शिंदे सर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते ते 2015 M.Sc., Ph.d. आहेत. त्यांचा व कोल्हापूरचा संबंध चांगला आहे. त्यामुळे ते कोल्हापूरवर प्रश्न विचारू शकतात. त्याचा रसायनशास्त्र विषय आहे व त्यांचा वैद्यकीय, रसायनशास्त्र व औषधशास्त्र या विषयांचा अभ्यास सखोल आहे. त्यांनी ऑक्सफर्ड व स्वित्झर्लंड*** विद्यापीठात व्हीजिटिंग प्रोफेसर म्हणून काम केले आहे. चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ‘साहित्यनिर्मितीत तंत्रज्ञानाचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात भाग घेतला होता. या माहितीच्या आधारावर शिंदे सर काय प्रश्न विचारू शकतात, याचा तर्क लावता येतो व आपणास योग्य उदा. RDX मध्ये कोणते रसायन असते, अश्रुधुरामध्ये कोणते रसायन असते. Narco-Test कशी केली जाते किंवा कोणाची करतात. रसायनशास्त्राचे जनक कोण? रसायनशास्त्राचे नोबेल 2023 कोणास देण्यात आले. भारतीय रसायनशास्त्रज्ञ कोण? अशा विविध प्रश्नांवर चर्चा करता येईल. साहित्य निर्मितीत आर्टिफिशअल इंटलिजन्सचे महत्त्व काय, माणूस आणि मंत्र यामध्ये मूलभूत फरक काय? भावना आणि साहित्य यांचा काही संबंध असतो का ? अशा प्रकारे सर्व सदस्यांची माहिती गोळा करा व प्रश्न तयार करून ठेवा. कोणतीही व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयानुसार प्रश्न विचारत असते. सर्वसाधारण मानसिकता अशी असते.
शेवटच्या टप्प्यात मानसिकता सकरात्मक ठेवा मी PSI होणारच, असा आशावाद ठेवा. मला 40 पैकी 35 गुण पडणारच, मुलाखत यशस्वी झाली आहे, असे चित्र मनपटलावर पाहा. सखोल मीडिया व आपण यांचा विचार करून ठेवा. आवडते लेखक, कवी, साहित्यिक यांच्या साहित्यकृती लक्षात ठेवा. उदा : कृष्णाखोत-रिंगाण. हल्की कामे, वाचन करत असाल तर त्यांचा सारांश लिहून ठेवा. महत्त्वाचे संपादकीय लेख काळजीपूर्वक वाचा जितके कष्ट पूर्व व मुख्यला घेतले तेवढेच मुलाखतीसाठी पण घ्या. एक मार्काने पोस्ट मिळते किंवा जाते, हे लक्षात ठेवा. उरलेल्या वेळेचा सदुपयोग करा. स्वत:शी सकारात्मक सुरुवात करा. तुमची मनोधारणा चांगली ठेवा. आपण प्रशासनात जाणार आहोत, याचे भान ठेवा. आपला भारत देश, लोकशाहीप्रधान आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांचा चांगला व चालू अभ्यास चांगला करा. तुमचे उत्तर हे प्रशासकीय अधिकार्याला साजेशे असले पाहिजे. उगाच Time Pass नको तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमचे आकलन, उत्तर देण्याची शैली, यावर तुमचे गुण अवलंबून आहेत. त्यामुळे ही शेवटची संधी समजून तयारी करा व यश संपादन करा.
Latest Marathi News PSI मुलाखतीची तयारी Brought to You By : Bharat Live News Media.